<
पाचोरा – शासकीय नियमाप्रमाणे शेतकऱ्यांना बांधावर खते मिळणे व लिंकिंग पद्धत बंद करण्याबाबत प्रहार जनशक्ती पक्षातर्फे प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांना नुकतेच निवेदन देण्यात आले.
या निवेदनात शासनाच्या शासकीय नियमाप्रमाणे शेतकऱ्यांना बांधावर खते मिळत नाही पर्यायाने शेतकऱ्यांना कृषी केंद्र चालकांकडून लिंकिंग पद्धतीने खते मिळत असून मोठ्या प्रमाणात युरिया खतांचा काळाबाजार होत आहे तसेच कोणत्याही कृषी केंद्रावर खतांचा शिल्लक साठा, बॅच नंबर,बोर्ड दिसून येत नसल्याने शेतकऱ्यांची सर्रास फसवणूक होत आहे असे म्हटले असून अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी येत असल्याचे देखील नमूद करण्यात आलेले आहे. अगोदरच मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांनी कोणाकडे न्याय मागावा अशी अवस्था असताना संबंधित विभागाकडून दुर्लक्ष झाल्याचे देखील निवेदनात सांगण्यात आले असून संबंधित दुकानदारांवर कारवाई न केल्यास प्रहार संघटनेतर्फे मोठे जनआंदोलन करण्यात येईल आणि त्यास कृषी विभाग व संबंधित विभाग जबाबदार राहतील असा इशारा देखील देण्यात आला असून जिल्हा अध्यक्ष भोसले यांच्या सुचनेनुसार निवेदनावर तालुकाध्यक्ष विशाल दत्तात्रय पाटील, तालुका प्रसिद्धीप्रमुख किशोर रायसाकडा,माधव पाटील, नितीन पाटील,राजविर ब्राम्हणे, योगेश पाटील, प्रशांत ठाकरे, सोरब दुधगे यांचेसह कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.