<
कळंब, प्रतिनिधी
कळंब शहरामध्ये कोरोनाचा प्रसार बऱ्याच प्रमाणात झाला असून आणखी प्रसार होऊ नये या उद्देशाने कळंब मध्ये ७ दिवसाचा ३ ऑगस्ट ते ९ ऑगस्ट जनता कर्फ्यु लावण्याचा निर्णय कळंब प्रशासनाने घेतला आहे. कळंब शहरामध्ये या सात दिवसात मेडिकल, दूध, बँक आणि पाणी वगळता सर्व आस्थापना बंद राहतील शिवाय किराणा आणि पेट्रोल सुद्धा बंद राहील. वैद्यकीय सेवा २४ तास सुरू राहतील तसेच पाणी आणि दूध सेवा सकाळी दहा पर्यंत सुरू राहील. कोरोना ग्रामीण भागातही पसरला असून गावांनी ही खबरदारी घेण्याची गरज आहे.
कोरोनाविरोधातील युद्ध समृद्ध महाराष्ट्र जिंकेल, मात्र हे युद्ध जिंकण्यासाठी जागरुक, सुजाण व दक्ष असलेल्या प्रत्येकाने योध्द्याची भूमिका बजावली पाहिजे, आम्ही गणवेशातील पोलीस असलोव तरी सर्वसामान्य नागरीक हे सुध्दा साध्या गणवेशातील पोलीसच आहे. अशा भूमीकेतून जनतेच्या खांद्याला खांदा लावून पोलीस विभाग कार्यरत राहील, असे मत पोलिस उपनिरीक्षक चैनसिंग गुशिंगे यांनी व्यक्त केले. कळंब उपविभागीय अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत नगरपालिका प्रशासन आणि नगराध्यक्ष, उपाध्यक्ष व शहरातील काही व्यापारी बैठक पार पडली. कळंब नगरीचे उपनगराध्यक्ष संजय मुंदडा यांनी जनता कर्फ्यु करण्यापेक्षा ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे, अशी भूमिका बैठकीत मांडली. मात्र इतरांच्या एकमताने या जनता कर्फ्युचा निर्णय घेण्यात आला.