<
जळगांव(प्रतिनिधी)- कोरोना संकटकाळात माणसापासून माणूस दूर गेला. जीव वाचविण्याच्या आकांताने नातेही दुरावले गेले. गेल्या मार्च महिन्यापासून सुरू झालेली ही लढाई अद्यापही सुरूच आहे. कोरोना बाधित रुग्ण उपचारानंतर बरे होऊन आपल्या घरी सुखरूप पोहोचत आहेत. प्रथमच रुग्ण व डॉक्टर यांच्यातील नातेही दृढ झाले आहेत. अशा योद्धांना जनतेतून सलाम केला जात आहे. अशातच कोरोनाच्या संकटकाळात जे योद्धा म्हणून कार्यरत आहेत आणि ज्यांना मदतीची गरज आहे, अशा कोरोनायोद्धांना कृती फाऊंडेशनच्या वतीने आज शहरातील एका कोविड सेंटर मध्ये कोरोनाशी लढा देणाऱ्या योध्यांसाठी आवश्यक असलेली औषधे, सुकामेवा, स्टीमर(वाफेचे मशिन), एनर्जी बार, अंडी, पाणी बॉटल्स, फळे व आयुष प्रमाणित रोग प्रतिकारक शक्ती वर्धक काढा पाकीट यांचे वाटप करण्यात आले. सदर उपक्रम पश्चिम परिमंडळ पुणे येथील पोलीस बिनतारी संदेश विभागाचे पोलीस अधीक्षक पी.टी.सोनवणे, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस उप अधीक्षक श्री. शेलार, पोलीस बिनतारी संदेश जळगांव विभागाचे पोलीस निरीक्षक श्री. बोंदर यांच्या मार्गदर्शक सुचनेनुसार राबविण्यात आला.
या उपक्रमाला जळगांव महानगरपालिकेचे शालिग्राम लहासे, प्रभाग क्रमांक ४ चे वार्ड ऑफीसर बाळासाहेब चव्हाण, स्थायी समितीचे माजी सभापती व नगरसेवक जितेंद्र मराठे, कामगार कल्याण अधिकारी मिलिंद पाटील, भानुदास जोशी,भरारी फाऊंडेशनचे दिपक परदेशी, सामाजिक कार्यकर्ते नितीन सपके, वैशाली पाटील, सत्यमेव जयतेचे मुख्य संपादक दिपक सपकाळे, प्रा. नारायण पवार, चेतन निंबोळकर, आदर्श नगर मित्र मंडळ यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले. सदर किटचे वाटप पोलिस बिनतारी संदेश विभागाचे अमित माळी, कृती फाऊंडेशनच्या कार्याध्यक्षा डॉ श्रद्धा माळी यांनी केले. प्रसंगी फाउंडेशन अध्यक्ष प्रशांत महाजन, सचिव जी.टी. महाजन, माधवबाग क्लिनिकचे डॉ. श्रेयस महाजन उपस्थित होते. या मिळालेल्या किट बद्दल कोरोना योध्यांनी समाधान व्यक्त करत आभार मानले. कोरोनाच्या महामारीने जग व जीवन बदलून जाणार आहे. या काळात काम करणाऱ्या सर्व डॉक्टरांचे कार्य कौतुकास्पद आहे. आपल्याला कोरोनासोबत जगण्याची सवय करावी लागणार आहे. कोरोनाला घाबरून जायची गरज नाही. मात्र, कुणीही बेसावध राहायला नको. वेळोवेळी शासनाकडून सांगण्यात येणाऱ्या नियमांचे प्रत्येकाने पालन करायला करावे. असे फाउंडेशनच्या वतीने आवाहन करण्यात आले.