<
जळगांव(प्रतिनिधी)- दुर्बल घटकांसाठी कार्यरत असलेल्या कृती फाऊंडेशनचे कार्याध्यक्ष तथा पोलीस बिनतारी संदेश विभागाचे अमित माळी यांनी निराधार आजीला हक्काचे छत बांधून दिले.याबाबत सविस्तर असे की, विधवा परित्यक्ता महिलांना कायद्याने बरेच काही दिले. मात्र, ते पदरात पडण्याआधीच अडथळे येतात. बऱ्याचदा ते हक्क, अधिकार मिळवताना प्रचंड संघर्ष करावा लागतो.
यामध्ये हयात खर्ची पडते. अनेक शहरांमध्येही हेच वास्तव असताना, असेच जळगांव शहरातील आठवडे बाजारा जवळील भंगार बाजार वस्ती समोर रस्त्यावर वास्तव्य असलेल्या एका आजीने काही दिवासांपूर्वी निःस्वार्थ जनसेवा फुड बँकेच्या सदस्यांकडे पावसापासून संरक्षण व्हावे म्हणून राहण्यासाठी छत म्हणून ताडपत्री ची मागणी केली होती. त्यांच्या या निरागस हाकेला साद देत कृती फाऊंडेशनचे कार्याध्यक्ष तथा पोलीस बिनतारी संदेश विभागाचे अमित माळी यांनी त्या आजीला ताडपत्री आणून देत, पावसापासून संरक्षणासाठी हक्काचे छत बांधून दिले. मागील दिवसात देखील श्री. माळी यांनी शहरातील हुडको परिसरात एका परिवाराच्या घरावर पत्रे टाकून दिले. हक्काचे छत मिळाल्यानंतर आजीने समाधान व्यक्त करत वाईटातील वाईट अनुभव घेतल्यानंतरही समाज हा चांगल्या माणसांचाच आहे आणि यात देवमाणसे अधिक आहेत, असे उद्गार काढले. प्रसंगी सतीश जावळे, धीरज जावळे उपस्थित होते.