<
जळगाव, (जिमाका) दि. 10 – कोवीड-19 वर आजतागायत कुठलेही औषध अथवा लस उपलब्ध झालेली नाही. तथापि, कोरोनामुक्त झालेला रुग्ण 28 दिवसानंतर कोणत्याही लक्षणाशिवाय राहिल्यास त्याचा प्लाझ्मा दुस-या बाधित रुग्णाला देता येतो. कोवीड-19 आजारातून उपचाराअंती बरे झालेल्या व्यक्तीचा प्लाझ्मा (रक्तद्रव) जर कोरोनाबाधित असलेल्या गंभीर रुग्णाला दिल्यास त्या रुग्णाचा जीव वाचवण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे जिल्ह्यातील कोवीड-19 आजारातून उपचाराअंती बरे झालेल्या व्यक्तींनी प्लाझ्मा दान करुन इतर रुग्णांचे जीवन वाचवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी श्री. राऊत म्हणाले, प्लाइमा दान ही प्रक्रिया रक्तदान प्रकियेप्रमाणेच आहे. 18 ते 60 वयोगटातील ज्या व्यक्तीचे वजन 50 किलोपेक्षा जास्त आहे तसेच त्याचे हिमोग्लोबीन 12.5 पेक्षा जास्त आहे, अशी कोरोनामुक्त व्यक्ती प्लाझ्मा दान करू शकते. जिल्ह्यातील जे नागरीक कोरोनामुक्त झाले आहे त्यांनी अथवा त्यांच्या परिचित ज्या व्यक्तीला कोवीड विषाणूचा संसर्ग झाला होता व त्यातून ते बरे झाले असतील त्यांनी प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे यावे. प्लाझ्मा दानामुळे कोणताही धोका त्या व्यक्तीला पोहचत नाही, प्लाझ्मा दानामुळे दोन व्यक्तींचे प्राण वाचू शकतात. त्यामुळे कोरोनामुक्त व्यक्तीला त्यांच्या परिचित व्यक्ती, नातेवाईकांनी प्लाझ्मा दानासाठी प्रवृत्त करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्याला प्रतिबंध करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या मागदर्शनाखाली आवश्यक त्या सर्व उपाययोजना राबविण्यात येत आहे. पालकमंत्र्यांच्या आवाहनास प्रतिसाद देऊन जिल्ह्यातील पहिल्या कोरोनामुक्त रुग्णाबरोबरच इतरही काही बरे झालेल्या रुग्णांनी प्लाझ्मा दान केलेले आहे. प्लाझ्मा दान करणे हे अमुल्य असल्याने जिल्ह्यात कोरोनामुक्त झालेल्या ज्या व्यक्तीं प्लाझ्मा दान करण्यास पात्र असतील त्यांनी प्लाझ्मा दान करुन गंभीर कोरोनाबाधित रुग्णांना जीवनदान द्यावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.