<
जळगांव(प्रतिनिधी)- कृती फाऊंडेशन व इन्सानियत ग्रुपच्या वतीने यावल तालुक्यातील दुर्गम भागातील दफनभूमी व स्मशानभूमी सुशोभीकरणाकरीता वृक्षारोपण अन् संवर्धन मोहीम राबविली जात आहे.
दफनभूमी व स्मशानभूमी सुशोभीकरण या अभियान अंतर्गत मोहराळा ता.यावल येथील दफनभूमी व स्मशानभूमीत वृक्षारोपण करण्यात आले.
याबाबत सविस्तर असे की, कृती फाऊंडेशनने केवळ वृक्षारोपणच नाही तर वृक्षांचे संवर्धन करून आजवर महाराष्ट्रात सुमारे ७ ते ८ हजार वृक्षांचे संवर्धन केले आहे. वाढदिवस-लग्न समारंभ वृक्ष भेट, वृक्ष संवर्धन करणाऱ्या शाळा असे अनेक उपक्रम राबवून स्थानिक नागरिकांनी देखील या कार्यात रस निर्माण केला आहे. वृक्ष लागवड लोकचळवळ होण्यासाठी समाज माध्यमांचा सहारा घेत फाऊंडेशनच्या वतीने प्रबोधन आणि आवाहन करण्यात येत आहे. अशातच कृती फाऊंडेशन व इन्सानियत ग्रुपच्या वतीने मोहराळा ता.यावल येथील दफनभूमी व स्मशानभूमीत वृक्षारोपण करण्यात आले. प्रसंगी सर्व रोपांचे पुजन करुन तद्नंतर दफनभूमी येथे जायला व्यवस्थित रस्ता नसल्याने ट्रॅक्टरवर वृक्षदिंडी काढत येथील दफनभूमीत वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमाला स्थानिक नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. दफनभूमी व स्मशानभूमित माणूस जायला घाबरतो मात्र कृती फाऊंडेशन व इन्सानियत ग्रुपने यावल तालुक्यातील मोहराळा येथील दफनभूमीत वृक्ष लागवड करून त्या फुलविण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच गावातील नागरिकांना वृक्ष संवर्धनासाठी रोपे दत्तक देण्यात आले आहे. इथे वृक्ष लावण्याने येत्या काळात अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना बसण्यासाठी सावली मिळणार असल्याने स्थानिक नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले. गेल्या काही वर्षात वृक्षतोड मोठ्या प्रमाणात झाल्याने त्याचा विपरीत परिणाम जनसामान्यांवर, येथील वातावरणावर झालेला दिसून येत आहे. गावांचा विस्तार वाढत आहे तसे वृक्षांची तोडही वाढत चालली आहे. यामुळे गावाच्या निसर्ग सौंदर्यीकरण आणि पर्यावरण तसेच हवामानावर याचा विपरित परिणाम होताना दिसून येत आहे. यामुळे याची भर भरुन काढण्यासाठी कृती फाऊंडेशन व इन्सानियत ग्रुपच्या वतीने यावल तालुक्यातील विविध गावातील दफनभूमी व स्मशानभूमीत हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे फाऊंडेशनच्या वतीने कळविण्यात आले आहे. सदर उपक्रम पोलीस बिनतारी संदेश विभागाचे अमित माळी, सलीम तडवी फाउंडेशनचे माजी अध्यक्ष डी.टी.महाजन यांच्या संकल्पनेतून घेण्यात आला असून फाऊंडेशनच्या वतीने कार्यध्यक्षा व माधवबागच्या क्लिनिकचे डॉ.श्रद्धा माळी, स्वामी समर्थ ग्रुप संचालिका प्रतीक्षा पाटील, नजराना तडवी, वनीकरण विभागाच्या सौ.साळुंखे यांनी रोपे इन्सानियत ग्रुपला सुपूर्द केली. सदर उपक्रमासाठी कृती फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रशांत महाजन, सचिव जी.टी.महाजन, कार्यध्यक्ष डॉ.श्रद्धा माळी, पोलीस बिनतारी संदेश विभागाचे अमित माळी, प्रा. नारायण पवार, गायत्री पल्सेसचे निखिल ठक्कर, सत्यमेव जयते न्यूजचे दिपक सपकाळे, निवेदिता ताठे, चेतन निंबोळकर यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. प्रसंगी सरपंच सुपडू मेहबूब, माजी सरपंच लहू पाटील, हाजी, बिस्मिल्लाह सायबू, शरीफ तडवी, अयाज तडवी, राजू तडवी, समीर तडवी, रज्जाक तडवी यांच्या हस्ते रोपांची लागवड करण्यात आली. तसेच सरफराज तडवी, सायबू तडवी, वसीम तडवी, युनूस तडवी, हैदर तडवी, फिरोज तडवी, चांद तडवी, आलम तडवी यांनी परिश्रम घेतले.