<
भडगाव(प्रमोद सोनवणे)- १५ ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिन अविस्मरणीय करण्याच्या उद्देशाने जळगाव जिल्हा भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेच्या वतीने एक दिवस सैनिक भावासाठी व त्यांच्या परीवारासाठी हा उपक्रम संपूर्ण जिल्ह्यात उत्साहपूर्ण वातावरणात राबविण्यात आला, या उपक्रमांतर्गत भडगाव तालूका युवा परिषदेच्या वतीने तालूक्यातील तांदूळवाडी, मळगाव व अंजनविहीरे या गावातील भारतीय सैन्य व पोलीस प्रशासनातील ८ आजी – माजी सैनिक व त्यांच्या परिवाराचा घरी जाऊन देशप्रेमाच्या भावनेतून कृतज्ञतापूर्वक सन्मान करण्यात आला.
उपक्रमासाठी उत्तर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राहूल वाकलकर, प्रदेश उपाध्यक्ष तेजस पाटील यांनी पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या तर जिल्हाध्यक्षा प्रतिक्षा पाटील, जिल्हा उपाध्यक्ष अनिल बाविस्कर, जिल्हा महासचिव दिव्या भोसले यांचे मार्गदर्शन लाभले. तालूकाध्यक्ष स्वप्निल निकम, तालुका समन्वयक शुभम रणदिवे, तालुका सचिव परेश पाटील यांनी सत्कार केले. यावेळी सत्कारार्थी आई-वडील व सैनिकांना गहीवरून आले व त्यांनी आभाराची भावना व्यक्त केली. दरम्यान, युवा परिषदेच्या वतीने तालूक्यातील युवकांनी अशा प्रकारे सामाजिक उपक्रम राबविल्याने तालुक्यात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले.