<
जळगांव(प्रतिनिधी)- झाडांचे महत्त्व अनादी काळापासून सर्वजण जाणतात. झाडांचे आणि सजीव जीवनाचे अतूट नाते आहे. तरीही मानव काही बाबतीत विकासाच्या नावाखाली वृक्षतोड करत आहे. त्याचे परिणाम, तोटे हे मानवाच्याच पदरात पडतं आहे. त्यावर उपाय म्हणून झाडे लावणे अपेक्षित आहे. यामुळे कृती फाउंडेशन व इन्सानियत ग्रुपच्या वतीने जिल्ह्यातील विविध गावांमध्ये स्मशानभूमी व दफनभूमीत वृक्षारोपण अन् संवर्धन मोहीम राबविली जात आहे.
याबाबत सविस्तर असे की, कृती फाउंडेशन व इन्सानियत ग्रुपच्या वतीने फाउंडेशनचे माजी अध्यक्ष डी.टी.महाजन, पोलीस बिनतारी संदेश विभागाचे अमित माळी, हरित सेनेचे मास्टर ट्रेनर प्रवीण पाटील, सलीम तडवी यांच्या संकल्पनेतून यावल तालुक्यातील हरिपुरा येथील दफनभूमी सुशोभीकरणाकरिता वृक्षारोपण करुन विविध फुलझाडे आणि ऑक्सिजन देणाऱ्या वृक्षांची रोपे मोठ्या प्रमाणात लावण्यात आली. प्रसंगी जलपुजन व सर्व रोपांचे पुजन करत वृक्षदिंडी काढून ग्रा.पं.सदस्य बिराद अनवर, चेतन निंबोळकर, मौलाना मजीत तडवी, शकूर तडवी यांच्या हस्ते वृक्षरोपण करण्यात आले. या उपक्रमात गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी देखील उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. फाऊंडेशनच्या वतीने कार्यध्यक्षा व माधवबागच्या क्लिनिकचे डॉ.श्रद्धा माळी, स्वामी समर्थ ग्रुप संचालिका प्रतीक्षा पाटील, नजराना तडवी, वनीकरण विभागाच्या सौ.साळुंखे यांनी रोपे इन्सानियत ग्रुपला सुपूर्द केली. सदर उपक्रमासाठी कृती फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रशांत महाजन, फाऊंडेशनच्या महिला आघाडीचे सरिता महाजन, पोलीस बिनतारी संदेश विभागाचे पोउनी आय.आय.तडवी, वसुंधरा फाऊंडेशनचे सचिन पवार,साने गुरूजी फाऊंडेशनचे नरेंद्र पाटील,प्रा. नारायण पवार, गायत्री पल्सेसचे निखिल ठक्कर, सत्यमेव जयते न्यूजचे दिपक सपकाळे, विशाल शर्मा यांचे विशेष सहकार्य लाभले. प्रसंगी पोलीस बिनतारी संदेश विभागाचे अमित माळी यांनी गावकऱ्यांना संबोधित करताना सांगितले की, अलीकडे वृक्षारोपणाचे कार्यक्रम होतात. सामाजिक वनीकरणाची कल्पना आता रूढ होत आहे. झाडे लावणे जितके आवश्यक आहे, त्याहूनही ती वाढवणे व त्यांचे जतन करणे महत्त्वाचे आहे. यासाठी प्रत्येकाने एकतरी झाड दत्तक घेतले पाहिजे. पर्यावरणाचा ढासळणारा तोल सावरण्याचा एक महत्त्वाचा उपाय म्हणजे वृक्षारोपण होय. तसेच निसर्गचक्र खंडित करण्याचा आपल्याला अधिकार नाही. ते आहे तसे अबाधित राखण्यातच मानवजातीचे हित आहे. पुढच्या पिढीच्या उज्ज्वल भवितव्याची जबाबदारी आपल्यावर आहे. म्हणून एकतरी झाड जगवा. असा संदेश व आवाहन यावेळी करण्यात आले. यावेळी फाऊंडेशन पदाधिकाऱ्यांसह अयाज तडवी, तुराब तडवी, अमजत तडवी, बिस्मिल्लाह तडवी, फकिरा अनवर, अकबर शेरखा, शरीफ तडवी आदी उपस्थित होते. गावात राबविण्यात आलेल्या उपक्रमाबद्दल गावकऱ्यांच्या वतीने फाउंडेशनचे आभार मानण्यात आले.