<
जळगांव(प्रतिनिधी)- स्वच्छता हे कोणाच्या दबावाखाली येऊन करण्यासारखे काम नाही आहे. आपल्या निरोगी आणि स्वस्थ जीवनासाठी ही एक चांगली सवय आहे. चांगल्या आरोग्यासाठी सगळ्या प्रकारची स्वच्छता आवश्यक आहे मग ती व्यक्तिगत असो की, आपल्या आजूबाजूच्या परिसरातील, याचाच एक भाग म्हणून कृती फाऊंडेशनच्या वतीने रावेर तालुक्यातील दुर्गम भागातील कळमोदा या गावात ग्राम स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
याबाबत सविस्तर असे की, लॉकडाऊनचे नियम शिथिल केल्यामुळे काही जनता व्यवसायासाठी बाहेर पडू शकत आहे. सर्वसामान्य लोकांनी आपले दैनंदिन व्यवसाय चालू केले आहेत. दैनंदिन व्यवहार चालू असताना काही लोकांना कोरोनाची लागण होते. जगात कोरोना विषाणू महामारीने थैमान घातले असून त्याचा संसर्ग आता अगदी कानाकोपऱ्यात पोहचला आहे. यामुळे हा कोरोना आजार आपल्या गावापर्यंत येऊ नये यासाठी कळमोदा गावातील रहिवाश्यांनी कृती फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांना गाव निर्जंतुकीकरणासाठी मागणी केली. त्यांनी केलेल्या मागणीची फाउंडेशनने तात्काळ दखल घेत कळमोदा गावात “ग्राम स्वच्छता मोहीम” राबविण्यात आली. यात सर्वप्रथम संपूर्ण गावातील कचरा जमा करुन गावाच्या बाहेर नेऊन जाळण्यात आला. तदनंतर संपूर्ण गावात निर्जंतुकीकरणासाठी हायपोक्लोराईडची फवारणी करण्यात आली. सदर उपक्रमाची संकल्पना कृती फाउंडेशन सचिव जी.टी.महाजन, पोलीस बिनतारी संदेश विभाग नाशिक शहरचे सफौ अफजल तडवी यांची असून पोलीस बिनतारी संदेश विभागाचे अमित माळी, सलीम तडवी, जिल्हा विशेष शाखेचे दीप्ती अनफट, चेतन निंबोळकर यांच्यावतीने राबविण्यात आली. यावेळी स्वच्छतेचे धडे देण्यात आले. पूर्ण गावात साफसफाई ठेवावी व सर्व नागरिकांनी दिवसातून दर दोन तासानंतर हात साबणाने किंवा सँनिटायजरने स्वच्छ धुवावे व कोरोना व्हायरसला गावात येऊ न देता आरोग्याची काळजी घ्यावी. असा संदेश यावेळी आयोजकांच्या वतीने गावकऱ्यांना देण्यात आला. प्रसंगी, सरपंच सरला पाटील, पोलीस पाटील हर्षाली जावळे, दिलदार तडवी, शाबीर तडवी, कुरबान तडवी, फकिरा तडवी आदी उपस्थित होते.