<
जळगांव(प्रतिनिधी)- “वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे” झाडे ही आपली खरे मित्र आहेत. झाडांचे उपयोग सांगावे तेवढे कमीच आहे. झाडे हवेचे प्रदूषण रोखण्यास मदत करते. सजीवांना ऑक्सिजन पुरवते. झाडांपासून मधुर फळे, रंगीत मनमोहक फुले, लाकूड मिळते. झाडांपासून सावली तसेच पक्षांना व जनावरांना आसरा मिळतो. उन्हापासून संरक्षण होते. झाडापासून अनेक औषधी बनवल्या जातात. झाडे मुळापासून ते पानापर्यंत सर्वकाही मानवाला अर्पण करते ते पण निस्वार्थीपणे. झाडांचे अनेक फायदे आहेत म्हणूनच प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावावे व त्याची काळजी घेऊन जगावावे. याचाच एक भाग म्हणून कृती फाऊंडेशनच्या वतीने कळमोदा या गावातील दफनभूमीत वृक्षारोपण करण्यात आले.
याबाबत सविस्तर असे की, ज्या पद्धतीने देशावर वेगवेगळे संकट येत आहे. प्रदूषणामुळे वातावरण खराब होत रोगराई पसरलेली आहे. या सगळ्यांवर मात करण्यासाठी पर्यावरण संतुलित ठेवण्याची गरज आहे. त्यासाठी फक्त झाडे लावून उपयोग नाही तर ती झाडे जगली पण पाहिजे, हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून कृती फाऊंडेशनकडून कळमोदा तालुका यावल या गावातील तडवी भिल्ल दफनभूमीत वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमाला पोलीस बिनतारी संदेश विभागाचे अमित माळी, सलीम तडवी, चेतन निंबोळकर आदी उपस्थित होते. प्रसंगी सर्व रोपांचे पुजन करत वृक्षदिंडी काढण्यात आली. या वृक्षदिंडीत चिमुकल्यांनी विशेष सहभाग नोंदविला होता. प्रसंगी, अमित माळी यांच्यावतीने उपस्थित गावकऱ्यांना वृक्षाचे संवर्धन करण्याची शपथ देण्यात आली. पुढील काही दिवसात पाच हजार झाडे लावणे व त्यांचे संगोपन करणे हे फाऊंडेशनचे उद्दिष्ट आहे, अशी माहिती अमित माळी यांच्यावतीने उपस्थितांना देण्यात आली. तसेच दफनभूमीत लावलेल्या झाडांचे योग्य संगोपन केल्यास, फाउंडेशनच्या वतीने दफनभूमीला एक भेट दिली जाईल, असे यावेळी श्री.माळी यांच्यावतीने आश्वासित करण्यात आले. प्रत्येकांनी आपल्या जीवनात एक तरी झाड लावून पर्यावरणाला जीवनदान दिले पाहिजे असा संदेश यावेळी देण्यात आला. सदर उपक्रम फाऊंडेशनचे माजी अध्यक्ष डी.टी. महाजन, अध्यक्ष प्रशांत महाजन, सचिव जी.टी. महाजन, नाशिक पोलीस बिनतारी संदेश विभागाचे स.फौ. अफजल तडवी यांच्या संकल्पनेतून घेण्यात आला असून गिरीश नेहते, सदगुरु सेवा मंडळाचे भारती चौधरी, संदीप चौधरी, दीप्ती अनफट, निखिल ठक्कर यांचे विशेष सहकार्य लाभले. प्रसंगी, मौलाना अब्दुल गफ्फार, कृषी विभाग(सेवा.) साबीर तडवी, कर विभाग(सेवा.)दिलदार तडवी, ग्रा.प. कुरबान तडवी, मुस्तफा तडवी, फकिरालाल तडवी, सुभेदार बुऱ्हान, सायबू तडवी, अब्दुल तडवी, जमाल तडवी, दगडू रमजान, अकील अजित, बशीर मेहबूब, महम्मद बलदार, कुरबान निजाम, सलीम तडवी, राजू तडवी, रशीद रमजान आदी उपस्थित होते.