<
जळगाव, दि.२९ – गेल्या चार महिन्यांपेक्षा जास्त काळ दुकाने बंद असल्याने व्यापारी अजूनही आर्थिक संकटातून सावरलेले नाहीत. लॉकडाऊनमुळे आवक पूर्णपणे थांबलेली असतानाही दुकानाचे मेंटेनन्स, भाडे, लाईटबील, पगाराचा भार मात्र व्यापारी बांधवांनी सहन केला आहे. अनलॉक प्रक्रियेमध्ये सोमवार ते शुक्रवार ५ दिवस दुकाने सुरु ठेवण्याची परवानगी मिळाल्याने व्यापाऱ्यांच्या जीवात जीव आला खरा, परंतु मार्केट अजूनही थंडावलेलेच
आहे. एकूणच जळगावचे ‘व्यापार विश्व आर्थिक तणावात आहे. त्यासाठी कृपया खालील मुद्दे विचारात घेऊन सोमवार ते रविवार दुकाने सुरु करण्याची परवानगी जाहीर करावी तसेच दुकानांची वेळ वाढवावी, अशी मागणी जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळातर्फे करण्यात आली आहे.
जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळाचे सचिव ललित बरडीया, कार्याध्यक्ष सुरेश चिरमाडे यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्त यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले.
अशा आहेत मागण्या
१) मार्केटसाठी पाचच दिवसांचा आठवडा असल्याने महिन्यात सुमारे ८ दिवस दुकाने बंद ठेवावी लागत आहेत. परंतु भाडे, मेंटेनन्स, सहकाऱ्यांचे पगार इत्यादी सर्व विषयांची पूर्तता एक महिन्याच्या हिशोबाने करावी लागत असल्याने प्रचंड आर्थिक ओढाताण सुरु आहे. शनिवार व रविवार या दोन्ही दिवशी सुद्धा दुकाने सुरु करण्याची परवानगी मिळाल्यास उत्पादन व विक्रीसाठी २५% अधिकचा कालावधी व्यापारी बांधवांना मिळेल व त्याची मदत आर्थिक ताण कमी करण्यासाठी व मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी नक्कीच होईल.
२) पितृपक्ष संपल्यावर सणासुदीच्या निमित्ताने ग्राहक खरेदीसाठी घराबाहेर पडतील. ७ दिवसांचा आठवडा झाल्यास ‘सोशल डिस्टंसिंग’ पाळणे व्यापारी बांधव आणि नागरिक सर्वासाठीच सोईचे होईल. कारण ५ दिवसांचा ताण ७ दिवसांमध्ये विभागला जाईल.
३) कोविड संदर्भात काळजी घेणे हे सर्वांचेच कर्तव्य आहे, परंतु ज्यापद्धतीने मंदीची लाट आलेली आहे त्यातून निर्माण झालेल्या आर्थिक
संकटावर मात करणे हीसुद्धा तितकीच महत्वाची जबाबदारी आणि तार्किकदृष्ट्या योग्य पाऊल आहे. त्यासाठी मार्केट ही अत्यंत महत्वाची जागा आहे.
४) तसेच मार्केटवर अवलंबून असलेले हमाल, हात मजुरी करणारे कामगार, रिक्षाचालक, मालवाहक इत्यादी सर्वांनाच २ दिवस मार्केट बंद राहत असल्याने तडजोड करावी लागत आहे. शनिवार-रविवारला दुकाने सुरु ठेवण्याची परवानगी मिळाल्यास हातावर पोट असलेल्या माणसांना रोजगार मिळेल.
अन्य शहरांप्रमाणे आपल्या जळगाव शहरातही शनिवार-रविवार दोन दिवस असलेली बंदी उठवून व्यापार सुरु ठेवण्याची परवानगी जाहीर
करावी व जळगावच्या ढासळलेल्या अर्थव्यवस्थेला चालना द्यावी, अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.