<
जळगाव (दि.2) प्रतिनिधी – संपूर्ण जगात कोरोना माहामारीसह अशांती निर्माण झाली आहे. अमेरिकेसह शांतीचे प्रवक्ते असणाऱ्या देशांमध्ये परिस्थिती बिघडत आहे. अशीच परिस्थिती राहिली तर जग तिसरे महायुद्ध बघेल. मानवासमोर आलेले हे मोठे संकट टाळायचे असेल तर महात्मा गांधी यांचे विचार आचारणात आणले पाहिजे व अशांत जगात शांतीचा संदेश दिला पाहिजे. असा संदेश माजी कुलगुरू डॉ. के.बी. पाटील यांनी दिला.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 151 व्या व लाल बहादुर शास्त्री यांच्या 116 व्या जयंती निमित्त गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे महात्मा गांधी उद्यानामध्ये महात्मा गांधीजींच्या पुतळ्याला सुतिहार अर्पण करण्यात आले. यावेळी डॉ. के. बी. पाटील बोलत होते. याप्रसंगी गांधी रिसर्च फाऊंडेशनचे डॉ. जॉन चेल्लादूराई, उदय महाजन, अनिल जोशी, नितिन चोपडा व सहकारी उपस्थित होते. कार्यक्रमाप्रसंगी शासकीय नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात आले. डॉ. के. बी. पाटील पुढे बोलताना म्हणाले की, जगात प्रत्येक देशांकडे विध्वंसक हत्यारे वाढली असुन सध्या तिसऱ्या महायुद्धाची स्थिती असल्याने जग अशांत आहे. अहिंसेतुनच मनशांतीकडे जाता येते त्यासाठी गांधीजींनी सांगितलेल्या मार्गावर चालले पाहिजे असा संदेश त्यांनी दिला.