<
जळगाव (दि.14) प्रतिनिधी:- कोरोना वैश्विक महामारीच्या प्रसंगानुसार गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे ‘बा-बापू 150’ जयंती वर्ष अंतर्गत महात्मा गांधी जयंती निमित्त ऑनलाइन राष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धा घेतली गेली. गांधीजींचे विचार नव्या पिढीमध्ये संस्कारित व्हावे; यासाठी घेण्यात आलेल्या स्पर्धेत भारतासह विविध देशांतून 2000 हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. प्रथम गटातून अन्वी प्रभाकर जयभाये (अकोला), द्वितीय गटातून निकिता दत्तात्रय गावडे (पुणे), तृतीय गटातून शुभम रंगराव पाटील (पुणे) यांनी प्रथम क्रमांक पटवकाविला.
कस्तुरबा गांधी आणि महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती वर्षानिमित्त गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे विविध उपक्रम घेतले जात असतात. शैक्षणिक, वैचारिक, सामाजिक, पर्यावरण संतुलन, आरोग्य विषयक उपक्रमांचा यामध्ये समावेश आहे. महात्मा गांधी यांनी भारतच नाहीतर संपुर्ण विश्वात स्वत:चे विचार आणि कृतिशिल आचरणातून आदर्श निर्माण केला आहे. महात्मा गांधीजी यांचे विचार पुढील पिढीमध्ये संस्कारित झाले पाहिजे या उद्देशाने ऑनलाईन राष्ट्रीय वत्कृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी मातृभाषेत गांधीजींच्या विचारांचे मंथन केले. स्पर्धेत मुलांपेक्षा मुलींनीचा सहभाग उल्लेखनिय होता.
तीन गटात घेण्यात आली स्पर्धा
गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे ऑनलाइन राष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम गटासाठी ‘गांधी माझे हिरो’, द्वितीय गटासाठी ‘आज गांधीजी असते तर काय करते?’ आणि तृतिय गटासाठी ‘अहिंसेचे जीवनातील नियम’ हे विषय घेण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी स्वेच्छेने भाषा निवडून व्हिडोओ करित गांधी रिसर्च फाऊंडेशनकडे पाठवायचे होते. ही स्पर्धा तीन गटामध्ये आयोजित केली होती. प्रथम गटामध्ये इयत्ता 5 वी ते 8 वी, दुसरा गट 9 वी ते 12 वी तर तृतिय गटामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी झाले आहे. महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, हरियाणा, तामिळनाडू, केरळ, उत्तराखंड, गोवा, कर्नाटक, पश्चिम बंगाल, ओरिसा आदी राज्यांमधील स्पर्धेक सहभागी झाले होते. गुजरात विद्यापिठामध्ये शिक्षण घेत असलेल्या झांबिया देशातील विद्यार्थ्यांनीसुद्धा सहभाग घेतला. सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांच्या मोजक्या व्हिडिओ मधील काही व्हिडीओ गांधी तीर्थच्या सोशल मिडाया फेसबुक व यु ट्यूब वर प्रसारित केले होते. याला देश-विदेशातील नागरीकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. दोन लाख लोकांनी साईडवर जाऊन व्हिडीओ बघितले तर जवळपास 60 हजाराच्यावर लोकांनी लाईक केले. गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या सोशल मीडिया पेज https://www.facebook.com/gandhiteerth/live/याhttps://youtu.be/AUJHAHP-ImAवर व्हिडोओ पाहता येतील.
हे आहेत विजेते
प्रथम गटामध्ये अन्वी प्रभाकर जयभाये (इयत्ता 5वी, प्रतिभा किड्स स्कूल, अकोला) हीने प्रथम क्रमांक पटकाविला. द्वितीय क्रमांकाने प्रगती प्रदीप गोंदकर (इयत्ता 8वी, सिल्व्हर महोत्सवी विद्यालय, बार्शी), तर तृतीय क्रमांकाने मुग्धा विजय याज्ञिक (इयत्ता 5वी, प्रताप विद्यामंदिर, चोपडा) विजयी झालेत. दुसऱ्या गटामध्ये प्रथम क्रमांकाने निकिता दत्तात्रय गावडे (इयत्ता 10वी, गर्ल्स इंग्लिश मिडीयम स्कूल, पुणे), द्वितीय क्रमांकाने एम. आयशा सामिहा (इयत्ता 9 वी, लिटल फ्लॉवर पब्लिक स्कूल, तिरूनेलवेली तामिळनाडू), तृतीय क्रमांकाने विष्णुप्रिया सक्सेना (इयत्ता 12वी, दयावती मोदी अकादमी, मोदीपुरम मेरठ) तर महाविद्यालयीन गटामध्ये प्रथम क्रमांकाने शुभम रंगराव पाटील (पुणे), द्वितीय भक्ती अरविंद देशमूख (पुणे), तृतीय क्रमांकाने निकिता कुमारी (कुरूक्षेत्र, हरियाणा) हे विजयी झाले. अंतिम विजेत्यांची घोषणा प्रोफेसर जी. व्हि. व्हि. प्रसाद, प्रो. जी. पालाणीथूराई, के. एम. नटराजन यांनी केली.
चार सत्रामध्ये विद्यार्थ्यांनी पाठविलेल्या व्हिडिओचे परिक्षण करण्यात आले. तंत्रज्ञान संबधित विषयाची तपासणी, वकृत्वासाठी घेतलेल्या विषयाची जाणिव, तत्व आणि नैतिकतेबाबतची तपासणी यानंतर परिक्षकांच्या परिक्षणातून अंतिम निकाल देण्यात आला. परिक्षक म्हणून गुजरात विद्यापीठाचे माजी कुलगूरू डॉ. सुदर्शन अय्यंगार, प्रा. विश्वास पाटील यांनी न्यायपूर्ण परिक्षण केले. तर प्राथमिक परिक्षण ज्ञानेश्वर शेंडे, हर्षल पाटील यांनी केले. सौ. अंबिका जैन, गांधी रिसर्च फाउंडेशनचे समन्वयक उदय महाजन, गांधी रिसर्च फाउंडेशनमधील शिक्षण विभागाचे डीन डॉ. जॉन चेल्लादूराई, प्रा. अश्विन झाला, नितीन चोपडा, सुधीर पाटील यांनी स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी समन्वय साधला. गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे चंद्रशेखर पाटील, कु.योगिता चौधरी, अशोक चौधरी, विश्वजित पाटील, दुर्वास नलगे, अनुभूती स्कूलचे पार्वती गोस्वामी आणि हुसेन भाई यांनीही सहकार्य केले. तंत्रज्ञानासंबधी योगेश संधानशिवे, जगदिश चावला, भूषण मोहरिर, चेतन पाटील आणि हिमांशू पटेल यांनी सहकार्य केले.