<
जळगांव-येथील शिवाजी नगर परिसर हे झपाट्याने वाढत असून त्याच बरोबरीने गुन्हेगारी व अवैध धंद्यात सुद्धा या परिसरात लक्षणीय वाढ होत असल्यामुळे या परिसरात स्वतंत्र पोलीस ठाणे निर्मितीच्या मागणीसाठी भाजपा नगरसेविका सौ.गायत्री शिंदे यांच्यासह भाजपा अल्पसंख्याक मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अॅड.शहेबाज शेख, वसंत पोळ, विलास खडके, उत्तम शिंदे, संजय सणस, धर्मेंद्र टेमकर यांनी आज उपजिल्हाधिकारी श्री.राहुल पाटील यांना निवेदन दिले.
नगरसेविका सौ.गायत्री शिंदे यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, शिवाजी नगर परिसर हा शहरातील जुना तसेच समिश्र व दाट वस्ती असलेला परिसर असून सदर परिसरात श्रमिक व मध्यमवर्गीय नागरिकांचा रहिवास आहे. भौगोलिक दृष्ट्या तसेच लोकसंख्येच्या दृष्टीने शिवाजी नगर परिसर हा झपाट्याने वाढत असून शिवाजी नगर परिसरात नव्याने अनेक उपवस्तांचा समावेश झालेला असून सदर परिसराची लोकसंख्या जवळपास ३६ हजार झाली आहे.
सुरुवाती पासूनच सदर परिसर हा जळगाव शहर पोलीस स्टेशनच्या सिमा क्षेत्रात समाविष्ट करण्यात आलेले आहे. शिवाजी नगर येथे शहर पोलीस स्टेशन अंतर्गत अनेक वर्षापासून फक्त एकाच पोलीस चौकी असून सदर पोलीस चौकीत २ पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे.त्यामुळे वाढती लोकसंख्या व त्या अनुषंगाने वाढत चाललेली गुन्हेगारी यास आळा घालण्यासाठी फक्त दोन पोलीस कर्मचारी अपुरे पडत आहेत. एखादी घटना घडल्यास
शिवाजी नगर परिसरातील नागरिकांना शहर पोलीस स्टेशन येथे येवून आपली तक्रार द्यावी
लागते. त्यामुळे बऱ्याच वेळा घटनेच्या ठिकाणी पोलीस कुमक पोहचण्याआधीच गुन्हेगार
पसार होतात. या सर्व परिस्थितीमुळे शिवाजी नगर परिसरातील स्थानिक नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. एक चौकीवर संपूर्ण सुरक्षा व्यवस्थेचा भार येत असल्यामुळे या ठिकाणी गुन्हेगारी फोफावत आहे. सर्व परिस्थिती व लोकसंख्येचा विचार करता शिवाजी नगर परिसरासाठी स्वतंत्र पोलीस स्टेशन असणे ही नितांत व काळाची गरज झाली आहे.
शिवाजी नगरास अनेक छोटे-मोठे रहिवासी परिसर जोडले गेले आहेत. सामाजिक व राजकीय दृष्टीने हा परिसर अती संवेदनशील असून, सदर परिसरात हिंदू, मुस्लीम, बोहरी, ख्रिश्चन अश्या अनेक समाजाचे व धर्माचे धार्मिक स्थळे व स्मशानभूमी, दफनभूमी असून, दर एक दोन दिवसात सदर परिसरात भांडणतंटे, चोरी, हाणामारी, पूर्ववैमस्यातून होणारे हल्ले अश्या प्रकारच्या घटना या घडत असतात. त्यामुळे दर महिन्याला शहर पोलीस स्टेशनला दाखल होणाऱ्या एकूण गुन्हयात जास्तीत जास्त गुन्हे शिवाजी नगर हद्दीतील असतात.
शहर पोलीस स्टेशन हे शिवाजी नगर परिसरापासून लांब अंतरावर असून, सदर ठिकाणी दोन पोलीस निरीक्षक व इतर सर्व कर्मचारी मिळून जवळपास १०० लोकांचे मनुष्यबळ आहे. सदर मनुष्यबळ हे अत्यंत तोकडे स्वरूपाचे आहे. तसेच या पोलीस कर्मचाऱ्यांवर विविध प्रकारचे सण, मिरवणूक, निवडणुका, कायदा सुव्यवस्था, अति महत्त्वाच्या व्यक्तीचा बंदोबस्त, रात्रीची गस्त, गुन्हे तपास, चौकशी अर्ज, अकस्मात मृत्युची चौकशी, अपघात, राजकीय आंदोलने, समन्स व वॉरंटची बजावणी यासह अनेक दैनंदिन कामांचा ताण सुद्धा पडत आहे. अश्यात शिवाजी नगर सारख्या संवेदनशील भागात शहर पोलीसांचे दुर्लक्ष होत आहे.
त्यामुळे सदर शिवाजी नगर परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे कामी व परिसरातील सर्वसामान्य नागरिकांना भयमुक्त जिवन जगणेसाठी शिवाजीनगर येथे स्वतंत्र पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात यावी अशी मागणी सदर निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.