<
एरंडोल ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात ट्रॉमा सेंटर उभारण्याचा प्रस्ताव वैद्यकीय अधीक्षक एरंडोल यांनी जिल्हा शल्य चिकित्सक ह्यांच्याकडे त्वरित सादर करावा असे निवेदन जळगाव जिल्हा भाजप वैद्यकीय आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष , नगरसेवक व रुग्ण कल्याण समिती सदस्य डॉ नरेंद्र ठाकूर ह्यांनी नुकतेच ग्रामीण रुग्णालय एरंडोल चे प्र . वैद्यकीय अधीक्षक डॉ मुकेश चोधरी व कार्यालयीन अधीक्षक श्री . पंकज पाटील ह्यांना दिले ! एरंडोल हे तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे व राष्ट्रीय महामार्गावर असल्यामुळे ग्रामीण रुग्णालय अद्ययावत असणे अत्यावश्यक आहे . राष्ट्रीय महामार्गावर हे शहर असल्यामुळे रस्ते अपघात होण्याचे प्रमाण जास्त आहे . व अश्या अपघातग्रस्त गंभीर रुग्णांना आपत्कालीन उपचार मिळणेसाठी ह्या ठिकाणी सुसज्ज असे शासकीय ट्रॉमा सेंटर उभारण्याची नितांत गरज आहे !ट्रॉमा सेंटर ला मंजुरी मिळाल्यास प्रशिक्षित डॉक्टर्स , आरोग्यसेविका , प्रयोगशाळा सहाय्यक अश्या विविध मनुष्यबळाची कमतरता दूर होणार असून प्रगत अश्या वैद्यकीय साधनसामुगी व रुग्णवाहिकाचीही उपलब्धता होणार आहे !कोव्हीड १९ च्या साथरोगाचा सामना करतांना ग्रामीण रुग्णालयामार्फत केल्या गेलेल्या विविध उपाययोजनांच्या मर्यादा तिथे उपलब्ध असलेल्या अपुऱ्या साधनसामुगीमुळे स्पष्ट झाल्या आहेत ! अश्या परिस्थितीत ह्या गंभीर बाबी ओळखून प्रशासनाने ह्या ट्रॉमा सेंटरच्या पर्यायाचा लवकर विचार केला पाहिजे !जामनेर , चोपडा व इतर ठिकाणी उपजिल्हारुग्णालय तर पारोळा येथे ह्यापूर्वीच ट्रॉमा सेंटरला मंजुरी मिळाली असल्यामुळे शासकीय आरोग्य सुविधेत काहीश्या प्रमाणात मागे पडलेल्या एरंडोल येथे सुसज्ज असे ट्रॉमा सेंटर उभे राहावे अशी मागणी ह्यापूर्वी हि विविध राजकीय व सामाजिक , वैद्यकीय क्षेत्रातील कार्यकर्त्यांकडून केली गेलेली आहे ! नुकत्याच जळगाव येथे पार पडलेल्या ” जिल्हा रस्ते सुरक्षा समितीच्या ” बैठकीत मान . जिल्हाधिकारी ह्यांनी ह्या शहरालगत असणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर होणाऱ्या भीषण अपघातांबद्दल व त्यात होणाऱ्या मृत्यूबद्दल चिंता व्यक्त करून , ते रोखण्यासाठी उपाययोजना आखाव्यात अश्या सूचना जिल्हा आरोग्य यंत्रणेला केल्या आहेत ! त्याच अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने एरंडोल शहरात सुस्सज असे शासकीय ट्रॉमा सेंटर उभारणीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात यावी व त्यासाठी वैद्यकीय अधीक्षक ह्यांनी असा प्रस्ताव करून योग्य तो पाठपुरावा करण्याची विनंती डॉ नरेंद्र ठाकूर ह्यांनी ह्या निवेदनात केली आहे !ह्या निवेदनाच्या प्रति , मान जिल्हा शल्य चिकित्सक , मान . जिल्हाधिकारी महोदय , मान . विधानसभासदस्य एरंडोल आणि मान . लोकसभासदस्य , जळगाव ह्यांना हि पाठविण्यात आल्या आहेत !