<
जळगाव (दि. 31) प्रतिनिधी – ‘कोवीड-१९’ या संसर्गजन्य आजाराचा प्रसार होऊ नये, यासाठी महाराष्ट्र शासनाच्या आदेशान्वये जळगाव शहरातील ऑक्सीजन पार्क असलेल्या महात्मा गांधी उद्यान व भाऊंचे उद्यान बंद ठेवण्यात आले होते. परंतु जळगावकरांसाठी आनंदवार्ता असून शहरातील दोघंही उद्याने शासकिय नियमावली पाळत सुरू करण्याचे भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशनला जळगाव महानगरपालिका प्रशासनाने सुचना दिल्या आहेत. त्यानुसार पहाटे 5 ते 10 व संध्याकाळी 5 ते 10 या वेळेत मंगळवार (दि.3) पासून जळगावकरांना दोघंही उद्यानांची आनंदानुभूति घेता येईल.
निसर्गाचा सहवास आणि शितल गारवामुळे मानसिक शांती व आरोग्य जपता येते. यासाठी महात्मा गांधी उद्यान व भाऊंचे उद्यान महत्त्वपूर्ण ठरतात. भाऊंच्या उद्यानातील ‘काव्य दालन’ व श्रद्धेय भवरलालजी जैन यांचा जीवनप्रवास व महात्मा गांधी उद्यानातील ‘मोहन ते महात्मा’ या महात्मा गांधीजींचे जीवनप्रवास सर्वांच्या ज्ञानात भर टाकतोच शिवाय सकारात्मक प्रेरणाही देत असतो. लहान मुलांसह, महिला, वृद्धांसाठी असलेली व्यायामाची साहित्य व खेळणी यामुळे तर दोघं उद्यान ऑक्सीजन पार्कच ठरले आहे.
लॉकडाऊन कालावधीमध्ये जळगाव जिल्हात घोषीत करण्यात आलेले व भविष्यात घोषित करण्यात येणारे प्रतिबंधित क्षेत्र वगळता बगीचे, पार्क व सार्वजनीक मोकळ्या जागेतील ठिकाणे मनोरंजनासाठी सुरू ठेवता येणार आहे. महात्मा गांधी उद्यान व भाऊंचे उद्यान हे प्रतिबंधीत क्षेत्रात समाविष्ठ नसल्याकारणामुळे पुर्व नियोजीत वेळेनुसार सुरू ठेवणेस जळगाव महानगरपालिकेने मान्यता दिली आहे. शासनाने दिलेल्या सुचनांच्या अनुषंगाने व कोविडसंबंधीत नियमांचे पालनकरीत भाऊंचे उद्यान व महात्मा गांधी उद्यान जळगावकरांच्या सेवेत रोज पहाटे 5 ते 10 व संध्याकाळी 5 ते 10 या वेळेत खुले असणार आहे.
आनंदवार्ता, पण नियम पाळा!
भाऊंचे उद्यान व महात्मा गांधी उद्यान सुरू होत असल्याने जळगावकरांना ती आनंदवार्ताच आहे. जळगावातील कोरोनाची संक्रमणाची आकडेवारी जरी कमी होत असली तरी दिवाळी व सण-उत्सवामुळे होणारी गर्दी टाळून ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ समजून प्रत्येकाने शासकीय नियम पाळले पाहिजेच. भाऊंचे उद्यान व महात्मा गांधी उद्यानामध्ये येताना प्रत्येकाने मास्क घालणे, सोशल डिस्टेंसिंग पाळणे, सोबत सॅनिटायझर असणे यासह कोरोनासंबंधीत वेळोवेळी जाहिर करण्यात आलेले सर्व शासकिय नियम पाळले पाहिजे. दोघंही उद्यानांमध्ये सूचनांचे तंतोतंत पालन करण्याचे आवाहन भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशनच्या व्यवस्थापनातर्फे करण्यात आले आहे.