<
लोककलेनेच आपल्याला घडविले, नाटकामुळेच मिळाली ‘स्टेज डेअरिंग’ – पालकमंत्र्यांनी व्यक्त भावना
जळगाव प्रतिनिधी दि. 8 :- लोक कलावंत सध्या खूप अडचणीत असल्याने त्यांना शासन दरबारी पाठपुरावा करून त्यांच्यासाठी मदतीचा प्रयत्न आपण करणारच आहोत. पण, यासोबत लोक कलावंतांसाठी हक्काचे अमळनेर येथे भव्य लोक कलावंत तमाशा भवन उभारण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याची ग्वाही पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिली. ते शहरातील छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात आयोजित खान्देश स्तरीय लोककलावंत परिषदेत बोलत होते.
पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या विशेष सहकार्याने रविवारी अखील भारतीय लोक कलावंत तमाशा परिषद, अखील भारतीय शाहीर परिषद आणि केशवस्मृती प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने खान्देश लोक कलावंत विचार परिषद – २०२० चे आयोजन करण्यात आले. कोरोनाच्या संकट काळात खान्देशी लोककला व लोक कलावंतांवर मोठा आघात झाला आहे. तमाशा, शाहिरी, गोंधळ, वाघ्या-मुरळी, वही गायन, सोंग, सोंगाड्या पार्टी आधी लोककला प्रकारात काम करणार्या व लोक कलेचे जतन व संवर्धन करणार्या लोक कलावंतांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. यावर मंथन करण्यासह विविध मागण्यांसाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी अध्यक्षीय मनोगताच्या प्रारंभीच ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, आज या परिषदेला आपण राजकारणी म्हणून नव्हे तर एक नाटक कलावंत म्हणून आलेलो आहे. मी स्वत: शालेय जीवनापासून नाटकात काम करत होतो. यानंतर संपूर्ण जिल्ह्यासह परिसरातील जिल्ह्यांमध्ये अनेक नाटकांमधून प्रमुख भूमिका निभावल्या. राजकारणात आवश्यक असणारी स्टेज डेअरिंग ही आपल्याला नाटकाने दिली. त्या काळात थोडा पैसा गाठीला असता तर मी आपल्यासमोर नट म्हणून आलो असतो. पण त्या नाटकातून निघून मी राजकारणाच्या नाटकात आल्याचे ना. पाटील म्हणाले. ज्या क्षेत्राने मला घडविले, त्या क्षेत्राविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी व त्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी मी येथे आलो आहे. आदर्श समाज निर्मितीसाठी कलावंतांचे योगदान महत्त्वपूर्ण असून कलावंत हा नेहमी समाजाला समृद्ध करत असतो.लोककला व संस्कृतीचे जतन करणे ही काळाची गरज आहे. कोरोनामुळे सर्वांनाच अडचणी आल्या असून याचा खूप मोठा फटका हा कलावंतांना बसला आहे. त्यांच्या मागण्या शासनाकडे पाठपुरावा करून पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे ना.गुलाबराव पाटील म्हणाले.
पालकमंत्री पुढे म्हणाले की, ज्येष्ठ कलावंतांना राज्य शासनाकडून दरमहा 2 हजार रूपयांचे निवृत्ती वेतन मिळते. जिल्ह्यातील वर्षातून फक्त १०० कलावंतांना ही मदत मिळत असते. तथापि, आपण मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करून 100 पेक्षा वाढीव कलावंतांना अशा प्रकारची मदत मिळावी म्हणून प्रयत्न करत आहोत. तर या योजनेतून खर्याखुर्या कलावंतांनाच मदत मिळावी असा आमचा प्रयत्न आहे. यासाठीच्या जिल्हास्तरीय समितीत कलावंतांमधून 1-2 सदस्याची नेमणूक करणार असल्याची घोषणा देखील त्यांनी केली. कलावंतांना पोलीस संरक्षण मिळावे आणि त्यांच्या वाहनांना काही काळ तरी टोलमधून सवलत मिळावी या मागण्यांसाठी आपण संबंधीत खात्याच्या मंत्र्यांकडे पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही देखील त्यांनी दिली.
या परिषदेत कलावंतांनी सादर केलेल्या मागण्यांमध्ये अमळनेर शहरात तमाशा भवन उभारण्याची मागणी केली होती. कलावंतांना उठ-बैस करण्यासाठी, महत्वाच्या बैठकांसाठी या प्रकारचे भवन हे आवश्यक असून याच्या पूर्ततेसाठी आपण प्रयत्न करू. तसेच या भवनासाठी अमळनेर नगरपालिकेकडून किमान 10 गुंठे जागा मिळवण्यासाठी आजपासूनच प्रयत्न सुरू करण्यात येणार असल्याची माहिती देखील ना. गुलाबराव पाटील यांनी या प्रसंगी दिली.
पालकमंत्री यांना मानपत्र देऊन केला गौरव
या कार्यक्रमात अखील भारतीय लोक कला तमाशा मंडळ व अ.भा. शाहिर परिषदेतर्फे शासनास वर्षपूर्ती बद्दल ना. गुलाबराव पाटील यांना मानपत्र प्रदान करण्यात आले. याप्रसंगी अखील भारतीय शाहिर परिषदेचे विभागीय अध्यक्ष तथा विचार परिषदेचे निमंत्रक विनोद ढगे आणि त्यांच्या सहकार्यांनी खान्देशी बोली भाषेतला एक अप्रतिम असा वग सादर केला. यात दारूमुळे आयुष्याचा होणारा नाश व शौचालयाचे महत्व हे अतिशय मनोरंजक पध्दतीत सादर करण्यात आले. याला उपस्थितांनी जोरदार दाद दिली. तर , विनोद ढगे आणि त्यांच्या सहकार्यांनीच कोरोनाच्या प्रतिकारासाठी करण्यात आलेल्या उपाययोजना आणि त्यांचे पालन करण्याबाबतची जनजागृती याबाबत लोकगीत सादर केले. या कार्यक्रमात ज्येष्ठ शाहीर शिवाजीराव पाटील (नगरदेवळा) यांनी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या जीवनावर आधारित पोवाडा सादर केला. यात ना. पाटील यांची सर्वसामान्य घरातील तरूणापासून ते आजवरच्या वाटचालीचा भरदार आवाजात सादर केलेला मागोवा हा उपस्थितांच्या हृदयाचे ठाव घेणारा ठरला.,
दरम्यान, याप्रसंगी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांना सन्मानपत्र देऊन अखील भारतीय तमाशा परिषदेचे कार्याध्यक्ष संभाजी राजे जाधव व विभागीय अध्यक्ष विनोद ढगे यांनी हृद्य सत्कार केला.
लोककलावंतांचा झाला सत्कार
याप्रसंगी लोककलेच्या क्षेत्रात संशोधनात्मक कार्य करून पीएच.डी. संपादन करणार्या डॉ. सीमाताई संतोष बडगुजर ( विषय-खानदेशातील प्रबोधन चळवळी आणि लोकनाट्य ); डॉ. अस्मिता गुरव ( विषय- महाराष्ट्राची लोककला लावणी); डॉ. सत्यजित साळवे ( विषय- खानदेशातील लोककलेचे व लोक कलावंतांची नोंदणी) यांचा विशेष सन्मान करण्यात आला. तर लोक कलेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्यांमध्ये दत्तूभाऊ नत्थु भाऊ भोकरकर (तमाशा क्षेत्रातील योगदान); शाहीर शिवाजीराव पाटील (शाहिरी क्षेत्रातील योगदान); गणेश अमृतकर ( वही गायन क्षेत्रातील योगदान); भास्कर अमृत सागर, धुळे (शाहिरी व तमाशा क्षेत्रातील योगदान); शेषराव नाना गोपाळ (धुळे) (तमाशा क्षेत्रातील योगदान); आनंद लोकनाट्य तमाशा मंडळ, जळगाव (तमाशा क्षेत्रातील योगदान) यांचा गौरव करण्यात आला.
विचार परिषदेमध्ये अ. भा. तमाशा परिषदेचे कार्याध्यक्ष संभाजी राजे जाधव यांनी तमाशा फड व तमाशा कलावंतांना असलेल्या अनंत अडचणींची मांडणी केली व कलावंतांच्या पाठीशी मा. गुलाब भाऊंनी खंबीरपणे उभे राहून लोक कलावंतांच्या मागणीचा शासन स्तरावर पाठपुरावा करावा अशी विनंती केली. या प्रसंगी व्यासपीठावर तमाशा परिषदेचे अध्यक्ष अविषकार मुळे, उपाध्यक्ष शेषराव नाना गोपाळ, मयुर महाजन, सचिव मोहित नारायणगावकर आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
खान्देश लोक कलावंत विचार परिषदेचे प्रास्ताविक, विचार परिषदेचे आयोजक व अ. भा. मराठी शाहीर परिषदेचे अध्यक्ष शाहीर विनोद ढगे यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात खान्देशातील विविध लोकं कलेच जतन संवर्धन व कोरोना ने कोलमडलेल्या लोक कलावंतांना आत्मनिर्भर करण्याच्या उद्देशानेच ही लोकं कलावंत विचार परिषद आयोजित करण्यात आली होती. असे विशद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिशा ढगे यांनी केले. आभार सचिन महाजन यांनी मानले. जळगाव धुळे व नंदुरबार या जिल्ह्यातून सुमारे 350 लोक कलावंत यांनी सहभाग नोंदवला.