<
जळगांव(प्रतिनिधी)- अवयवदान चळवळीतील कार्यकर्त्यांची राष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्त जळगांव जिल्ह्याधिकाऱ्यांकडे मागणी करण्यात आली. २७ नोव्हेंबर हा राष्ट्रीय अवयवदान म्हणून संपूर्ण देशात साजरा केला जातो, त्यानिमित्त छाया किडनी केअर व रिलीफ फाउंडेशन, सुखकर्ता फाउंडेशन आणि आनंद डायलेसिस सेंटर जळगाव आणि आर्या फाउंडेशन ह्यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कक्षात आयोजित कार्यक्रमात अवयवदान चळवळीसाठी पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते नीलिमा अहिरराव आणि विमल जोशी या किडनी दात्यांना सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. आपल्या शरीरातील अवयव जिवंतपणी दान करून कुटुंबातील प्रिय व्यक्तीला पुर्नजन्म देणाऱ्या या दोघी महिलांचे कार्य प्रेरणादायी असल्याचे मत जिल्हाधिकारी यांनी याप्रसंगी व्यक्त केले. महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेल्या “अवयवदान प्रतीज्ञा” प्रतिमेचे विमोचन या विशेष दिनाच्या प्रसंगी जिल्हाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले. सुखकर्ता फाउंडेशनचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांनी सर्व शासकीय कार्यालयात या प्रतिमा आगामी काळात लावणार असल्याचा मनोदय व्यक्त केला. या प्रसंगी छाया किडनी केअर व रिलीफ फाउंडेशनचे किशोर सूर्यवंशी व आनंद डायलेसिस सेंटरचे डॉ.अमित भंगाळे, आर्या फाउंडेशनचे डॉ.धर्मेंद्र पाटील यांनी अवयवदान मोहिमेस गती येण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे निवेदन सादर केले त्यात जिल्हा स्तरावर अवयवदान समिती स्थापन व्हावी, शहरातील सर्व क्रिटिकल केअर सेंटर मध्ये मेंदू मृत जाहीर करण्यासाठी समिती कार्यान्वित होण्यासाठी निर्देश देणे, मेंदूमृत झालेल्या रुग्णाचे अवयव काढण्यासाठी परवानगी शहरातील अद्यायवत रुग्णालयास मिळावी, विभागीय अवयव प्रत्यारोपण समितीचे उपकेंद्र जळगावात व्हावे, अवयवदान संकल्पपत्र भरण्याची सुविधा सर्व वैद्यकीय महाविद्यालय, ग्रामीण रुग्णालय येथे करण्यात यावी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात देहदानाची सुविधा सध्या उपलब्ध झाल्यामुळे त्याबाबत जनजागृती करण्याबाबत नमूद करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी या सर्व बाबींवर सकारात्मक प्रतिसाद देत प्रशासन व सामाजिक संस्था एकत्रितपणे या मोहिमेस गती देण्याचे कार्य नक्की करतील अशी आशा व्यक्त करून अवयवदान मोहिमेस शुभेच्छा दिल्या. प्रसंगी मुसा शेख, छाया किडनी केअर व रिलीफ फाउंडेशन यांनी आभार मानले.