<
आज १५ ऑगस्ट २०१९.हिंदुस्थान अर्थात भारताचा ७२ वा स्वातंत्र्यदिन. १९४७ साली अनेक हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची आहूती देत भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले.भारताला आज स्वातंत्र्य मिळून ७२ वर्षे झालीत.मात्र तरीही आपल्या या लोकशाही व संस्कृतीप्रधान देशाची स्थिती खूपच बिकट वाटते.विज्ञानाने आज देशाला प्रगतीकडे नेले पण येथील समाजाने मात्र भारताला एकाच ठिकाणी जखडून ठेवले आहे.जणू भारत देश आजही पारतंत्र्यातच आहे.आज देशात मुंबई, दिल्ली, कोलकाता, बंगलोर,चेन्नईसाराख्या ‘मेट्रो’ सिटी आहेत.मात्र याच देशात ‘धारावी’ सारखी जगातील सर्वात मोठी झोपडपट्टीही आहे.देशातील अनेक खेड्यापाड्यांमध्ये वीज, पाणी, अन्न यांसारख्या प्राथमिक सुविधाही उपलब्ध नाहीत.भारताची स्थापना झाली तेव्हा हा देश एक लोकशाही व धर्मनिरपेक्ष देश म्हणून जगासमोर आला.या देशात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला ‘भारतीय’ची पदवी मिळाली.आज मात्र ‘भारतीय’ हा शब्द ‘प्रतिज्ञे’पुरता मर्यादित राहिला आहे.काय म्हणून एक नागरिक येथे भारतीय आहे ? हा मोठा प्रश्न या देशात राहणाऱ्या सामान्य जनतेला पडतो.इथे सामान्य जनतेला सुखसुविधा उपलब्ध नाहीत.इथे सामान्य जनता शासकीय कुरघोड्यांमुळे अनेक योजनांपासून वंचित राहते.इथे काही कागदपत्रे काढायचे असल्यास शासकीय कार्यालयात त्यासाठी अनेक महिने पायपीट करावी लागते.खिशात पैसा असला तरच काम होते.एखाद्या जाती किंवा धर्माचा अधिकारी किंवा मंत्री असल्यास त्याच जाती-धर्माचे कामं प्रथम होतात.मग ‘भारतीय’ म्हणजे काय ? व ‘भारतीय’ म्हणून कोणाला हाक मारावी ?इथे आज जनतेला वेगळा विदर्भ, वेगळी मुंबई, वेगळे तेलंगण असे प्रत्येक राज्याचे विभाजन पाहिजे.प्रत्येक जातीचे आरक्षण पाहिजे व त्यासाठी आज नागरिक रस्त्यांवर उतरतात तर आमचे राज्यकर्ते त्यासाठी राजकारण करतात,राजीनामे देण्याची खेळी करतात.मग ‘भारतीय’ म्हणजे काय ?इथे एक कथा सांगावीशी वाटते,’एकदा एक अमेरिकन नागरिक भारतात फिरायला येतो आणि भारतदर्शन घेवून जेव्हा तो नागरिक परत अमेरिकेत जातो,तेव्हा त्याच्या शेजारी राहणारा मुळचा भारतीय असलेला त्याचा मित्र त्याला विचारतो ”कसा वाटला आमचा भारत ?” तेव्हा अमेरिकन म्हणाला “भारत एक अद्वितीय देश आहे,मी ताजमहाल बघितले,दिल्ली-मुंबईपासून प्रत्येक प्रसिध्द असलेले छोटे-मोठे स्थळ बघितले व तेथील सौंदर्य न्याहाळले.वास्तवमध्ये भारत फक्त आणि फक्त एकच आहे.भारतासारखे सौंदर्य दुसरीकडे नाहीच.”भारतीय आपल्या देशाची स्तुती ऐकून खुपच खुश झाला व त्याने अमेरिकनला विचारले “आमचे भारतीय कसे आहेत ?” हे ऐकून अमेरिकन थोडा शांत झाला आणि मग बोलला, “तिथे तर मी कोणताच भारतीय बघितला नाही.” हे ऐकून भारतीय मित्र त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागला.अमेरिकन बोलत राहिला, “जेव्हा मी विमानतळावर उतरलो तेव्हा सगळ्यात अगोदर माझी भेट ‘मराठी’ लोकांशी झाली.पुढे प्रवास केला तेव्हा ‘पंजाबी’, ‘हरियानी’, ‘गुजराथी’, ‘बिहारी’, ‘तमिल’ आणि ‘आसामी’सारखे खुपच लोक भेटले. कुठे ‘हिंदू’ भेटला तर कुठे ‘सीख’, ‘मुस्लिम’ आणि ‘ईसाई’ भेटले.लहान ठिकाणी गेलो तर तिथे ‘बनारसी’, ‘बरेलवी’, ‘जैनपुरी’, ‘सुल्तानपुरी’ अशी लोक भेटली.मंत्र्यांशी ओळख करायला गेलो तर तिथे ‘काँग्रेसवाले’, ‘भाजपावाले’, ‘बसपावाले’ यांसारखे मंत्री भेटले.खेड्यांमध्ये गेलो तर तिथे ‘ब्राम्हण’, ‘क्षत्रिय’, ‘वैश्य’ असे ‘श्रीमंत’ आणि ‘गरीब’ भेटले.मात्र ‘भारतीय’ म्हणून तर एकही भेटला किंवा दिसला नाही.” हे ऐकून भारतीय मित्र खाली मान करून तेथून निघून गेला.’हेच आपल्या देशाचे भीषण वास्तव आहे आणि हे देशासाठी खूपच हानीकारक आहे.आपल्या देशातील राजकारण्यांनाही ‘भारतीय’ नकोच पाहिजेत.कारण भारतीयांना वेगळे केल्यास (वेगळ्या जातीत, वेगळ्या धर्मात ) त्यांचा विजय सोपा होतो.पण ज्या दिवशी सगळ्यांनी ‘भारतीय’ म्हणून मतदान केले,तो दिवस या राजकारण्यांना सर्वात मोठा धडा शिकवेल आणि तेव्हाच आपला हा भारत देश खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य होईल आणि एक मजबूत व विकसित देश म्हणून जगासमोर येईल.म्हणून प्रत्येक भारतीय नागरिकाला हिच विनंती आहे की, जात-पात व धर्माच्या नावावर आपापसात लढत बसत स्वतःसह देशालाही अधोगतीच्या दरीत न ढकलता आपले ‘भारतीयत्व’ परत मिळवा व ‘भारतीय’चा खरा अर्थ समजून घ्या.जय हिंद ! जय भारत !
– स्वप्निल शांताराम सोनवणेनंदगाव ता.जळगावमो. 7507728977