<
जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) दि.2 – कोविड-19 मुळे उध्दभवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यावर्षी 6 डिसेंबर, 2020 रोजी परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी, दादर येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाबाबत मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या आहेत.
राज्यात तसेच जिल्ह्यात अद्यापही कोरोनाचे रुग्ण मोठया प्रमाणावर आढळून येत असल्याने चालू वर्षी कोविड या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव विचारात घेता गेल्या सात-आठ महिन्यात आलेले सर्व धर्मीय सण/उत्सव अत्यंत साध्या पध्दतीने व लोकांनी एकत्रित न येता साजरे केलेले आहेत. त्यामुळे कोविड पार्श्वभूमीवर, यावर्षी डॉ. बाबासाहेब आबेडकर यांचा दिनांक 6 डिसेंबर, 2020 रोजी चैत्यभूमी दादर येथील महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे दूरदर्शनवरुन थेट प्रक्षेपण करण्यात येणार असल्याने जळगाव जिल्ह्यातील सर्व अनुयायांनी चैत्यभूमी दादर येथे न जाता घरातूनच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करावे.
महापरिनिर्वाण दिन हा दिवस भारतीयांसाठी दु:खाचा गांभिर्याने पालन करावयाचा असून परपुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोविड संसर्गाचा विचार करता महापरिनिर्वाण दिनी सर्व अनुयायांनी विचारपूर्व व र्धेर्याने वागून जळगाव जिल्ह्यात/तालुक्यात महामानव डॉ. बाबासाहेब आबेडकर यांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम गर्दी न करता घरी राहूनच अभिवादन करण्याचे सर्व अनुयायांना आवाहन अभिजित राऊत, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.