<
जळगाव (प्रतिनिधी) – लहान मुलांमधील कलागुणांना वाव मिळावा याकरिता जळगावात अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या संलग्न बालरंगभूमी या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. बालरंगभूमी परिषदेच्या जळगाव शाखेची मुहुर्तमेढ ज्येष्ठ नाट्यकलावंत विनोद ढगे यांच्या माध्यमातून गेल्या वर्षी करण्यात आली होती. या बालरंगभूमी परिषदेच्या कार्याला चालना मिळावी या उद्देशाने अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती नियामक मंडळाच्या सदस्या व जळगाव जिल्हा शाखेच्या अध्यक्षा ॲड. रोहिणीताई खडसे खेवलकर यांची प्रमुख सल्लागार मार्गदर्शकपदी निवड करण्यात आली.
आज (दि. ५) रोजी सायंकाळी बालरंगभूमी परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी उपस्थित सदस्यांच्या एकमताने ॲड.रोहिणीताई खडसे खेवलकर यांची प्रमुख सल्लागारपदी निवड करण्यात आली. बालरंगभूमी परिषदेच्या पुढील तीन महिन्यातील कार्यक्रमाच्या आयोजनाविषयी विनोद ढगे यांनी उपस्थित सदस्यांना माहिती दिली.
या बैठकीला ॲड.रोहिणीताई खडसे खेवलकर यांच्यासमवेत विनोद ढगे, योगेश शुक्ल व जळगावातील बालरंगभूमीशी संबंधित असणारी, सचिन महाजन, अमोल ठाकूर, अमरसिंह राजपूत, हनुमंत सुरवसे, आकाश बाविस्कर, दीपक महाजन, सुदर्शन पाटील, किरण अडकमोल, चेतन कुमावत, दुर्गेश आबेकर, अरविंद राजपूत, आरती गोळीवाले, नेहा वंदना सुनिल आदी रंगकर्मी उपस्थित होते.