<
सशस्त्र सेना ध्वज निधी संकलन मोहिमेचा राज्यपालांच्या हस्ते आरंभ
मुंबई, दि. 7 : अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपले जवान राष्ट्रध्वजाच्या सन्मानासाठी सर्वस्व पणाला लावतात व देशाच्या सीमांचे रक्षण करताना प्राणांची आहुती देतात. प्रत्येक नागरिकाच्या मनात सैनिकांविषयी अत्याधिक आदराची भावना आहे. त्यामुळे सशस्त्र सेना ध्वज निधीला योगदान देणे आपले कर्तव्यच आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.
सशस्त्र सेना ध्वज दिनानिमित्त मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यांच्या ध्वज निधी संकलन मोहिमेचा आरंभ राज्यपालांच्या हस्ते राजभवन येथे झाला. यावेळी राज्यपालांनी ध्वज निधीला आपले योगदान दिले. सैनिक कल्याण विभागाचे संचालक प्रमोद यादव यांनी राज्यापालांच्या जॅकेटवर सशस्त्र सेना ध्वजाची प्रतिकृती लावली.
ध्वज निधीला योगदान देणे ही भावना महत्त्वाची आहे; किती योगदान देतो हे महत्त्वाचे नाही, असे सांगून ध्वज निधीला सढळ हस्ते योगदान देण्याचे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले.
राज्यपालांच्या हस्ते यावेळी कोकण विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ, मुंबईचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर, मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर व जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कॅप्टन विद्या रत्नपारखी यांचा निधी संकलनाचे उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल राज्यपालांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
नौसेनेच्या पश्चिम विभागाचे मुख्य ध्वज अधिकारी व्हाईस अॅडमिरल अजित कुमार पी, स्थल सेनेच्या महाराष्ट्र, गुजरात व गोवा मुख्यालयाचे प्रमुख जनरल ऑफिसर कमांडिंग एस.के.प्राशर, सामान्य प्रशासन विभागाच्या प्रधान सचिव सीमा व्यास, एअर व्हाईस मार्शल एस आर सिंह, एअर ऑफिसर कमांडिंग, मेरिटाईम एअर ऑपरेशन, तसेच ध्वज निधीला योगदान देणाऱ्या संस्थांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.