<
जळगांव(प्रतिनिधी)- येथील एस.एन.डी.टी. महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर असोसिएशन ऑफ इंजिनिअर्स (बानाई) जळगाव या अभियंता संघटनेमार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय वैचारिक अभिवादन स्पर्धा परीक्षा पारितोषिक वितरण समारंभ घेण्यात आला. या प्रसंगी जळगाव जिल्ह्यातील प्रमुख शाळा महाविद्यालये यांचे प्रमुख, यांना परीक्षेसाठी केलेल्या सहकार्याबद्दल सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले व त्या संस्थेचे समन्वयक यांनाही सन्मानपत्र, प्रमाणपत्र, कवितासंग्रह देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी इंजिनियर अनिल डोंगरे, (सहाय्यक कार्यकारी अभियंता महापारेषण), अनिल मोरे (इंडिया स्टिंग न्यूज), चेतन निंबोळकर (दैनिक सत्यमेव जयते) यांच्यासह बाणाईचे जिल्हाध्यक्ष इंजि.आर.जे. सुरवाडे व सदस्या सरोजिनी लभाने आदी मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केल्यावर सुष्मिता भालेराव यांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन घेतले. मंचावरील मान्यवरांचे स्वागत इंजि.मनोहर तायडे, सुशांत मेढे, विद्याधर भालेराव, सी.डी तायडे, अजय निकम, बी.के. तायडे, अमोल वाघमारे, अबोली तायडे, ममता सपकाळे यांच्या हस्ते कवितासंग्रह व प्रमाणपत्र देऊन करण्यात आले. सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदिका ज्योती राणे यांनी शब्दाशब्दात काव्याची पेरणी करत कार्यक्रमाची रंगत वाढविली. अध्यक्ष सुरवाडे यांनी बानाईचा परिचय व उपक्रम यांची माहिती सर्वांना दिली. याप्रसंगी उ.म.वि. चे डॉ.अनिल डोंगरे, प्राध्या. हर्षल पाटील, मणियार महाविद्यालयाचे डॉ. क्षीरसागर, प्राध्या. जी.व्ही धुमाळे, एस. एन. डी .टी. चे खडे सर, भुसावळ हायस्कूलचे मनीष गुरचळ, धनाजी नाना महाविद्यालय, फैजपुरच्या प्रतिमा बारी, शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राध्या. नन्नवरे आदींचा सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व विद्यार्थी प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी सत्कारार्नीथींनी आपले मनोगत व्यक्त केले. डॉ. अनिल डोंगरे यांनी बाबासाहेबांचा कार्यगौरव इंग्रजी भाषणातून केला. डॉ. क्षीरसागर यांनी बाबासाहेबांचे मानव अधिकार व मूलभूत अधिकार या विषयीचे जागतिक दर्जाचे कार्य विषद केले. सीमा बारी व मनीष गुरुचळ यांनी बानाईचे कौतुक करून दरवर्षी हा उपक्रम राबवावा, असे आवाहन केले. प्राध्यापक नन्नवरे यांनी व माजी संचालक (ग.स.)व्ही.ए. साळुंखे यांनी बानाईस शुभेच्छा दिल्या व सहकार्याची ग्वाही दिली. ज्योती राणे यांचा आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी गौरव करण्यात आला. यानंतर निमंत्रित कवींचे कविसंमेलन झाले. यात सहभागी कवींनी आपल्या रचनाद्वारे बाबासाहेबांना आदरांजली वाहिली. ज्योती राणे यांनी आपली ‘विश्वनायक’ ही रचना ऐकवून बाबासाहेबांचे ऋण मान्य केले. चित्रा पगारे यांनी ‘हिंदू कोड बिल’ या कवितेतून बाबासाहेबांनी महिलांवर केलेले उपकार विषद केले. सुखदेव वाघ यांनी ‘अजूनही अंधार’ ही हृदयस्पर्शी रचना सादर केली. गंगा सपकाळे यांनी ‘६ डिसेंबर५६ साली’ही छान कविता सादर केली. दिलीप सपकाळे यांनी ‘साध्वी’ ही कविता म्हटली. तर सुरवाडे यांनी ‘विनंती वृद्ध हमालाची’ ही व शेवटी ईश्वर वाघ यांनी ‘श्रद्धांजली गीत’ सादर करून सभागृह गंभीर केले . सरोजनी लभाने यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले.