<
जळगाव (प्रतिनिधी) : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दर्शनी भागामध्ये ब्रिटिशकालीन पाणी निर्जंतुकीकरण करण्याचे मशीन (बॉयलर मशीन) हे “अँटिक पीस” म्हणून ठेवण्यात आले असून हे मशीन परिसराची शोभा वाढवीत आहे.
अधिष्ठाता डॉक्टर जयप्रकाश रामानंद यांच्या नेतृत्वाखाली सुशोभीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले. यानंतर अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैभव सोनार, डॉ. इम्रान पठाण, डॉ. सिद्धार्थ चौधरी, कर्मचारी अनिल बागलाणे यांच्यासह संबंधितांनी या कामाची पाहणी केली. हे ब्रिटिशकालीन बॉयलर मशीन मुख्य गेट क्रमांक २ मधून येताना दर्शनी भागात उभारले असल्यामुळे परिसराची शोभा वाढवीत आहे.
हे निर्जंतुकीकरण करण्याचे मशीन जळगावच्या रुग्णालयात १३ ऑगस्ट १९३६ रोजी आणले गेले असल्याचे दिसून येत आहे. रुग्णालयाचे काही दिवसांपासून भंगार काढण्याचे काम सुरू असून यामध्ये हे दुर्मिळ आणि ऐतिहासिक असे मशीन आढळून आले. यानंतर हे मशीन दर्शनी भागात रंगकाम करून नव्याने पोलिश करून लावण्याचा निर्णय डॉ. रामानंद यांनी घेतला. तसेच त्याच्या खालील दगडही रंगवण्यात आले असून महाविद्यालयात भेट देणार्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
निर्जंतुकीकरण करण्याचे मशीनमधील यंत्रणा अत्याधुनिक स्वरूपाची असून यातील नट बोल्ट पितळी आणि आतील रचना वैविध्यपूर्ण असून मशीन विशिष्ट बिडाचे धातूचे आहेत. पाणी विशिष्ट व कमी-जास्त तापमानात गरम करण्याचे तंत्र यात होते. तसेच पाणी शुद्धीकरणसुद्धा या मशिनद्वारे करण्यात येत होते. १९३६ साली विजेचा वापर नव्हता म्हणून हे मशीन वापरले जाई, असा उल्लेख आढळतो.
दर्शनी भागात हे मशीन लावण्यात आले असून त्याच्या बाजूला त्याची माहिती देणारा फलक देखील लवकरच लावला जाणार असल्याची माहिती डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी दिली आहे.