<
सर्व सभासदांना मिळणार १५ टक्के लाभांश : चष्मा लागल्यास तो देखील मोफत
जळगाव, दि.१६ – जिल्ह्यात नेहमी विविध सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या एकता रिटेल किराणा मर्चंटस पतसंस्थेतर्फे सर्व सभासदांची मोफत डोळे तपासणी केली जाणार आहे. इतकंच नव्हे तर सर्व सभासदांना १५ टक्के लाभांश देखील दिला जाणार असून ज्या सभासदांना चष्माची गरज भासेल त्यांना चष्मा देखील मोफत दिला जाणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष ललित बरडीया यांनी दिली आहे.
शहरासह जिल्ह्यात नेहमी विविध सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या एकता रिटेल किराणा मर्चंटस पतसंस्थेतर्फे यावर्षी देखील सभासदांना भेट दिली जाणार आहे. कोरोनामुळे यावर्षी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यात आली नसली तरी अध्यक्ष आणि संचालक मंडळाची बैठक नुकतेच पार पडली. शासनाने प्रदान केलेल्या अधिकारान्वये पतसंस्थेच्या सर्व सभासदांना १५ टक्के लाभांश देण्याचा एकमताने निर्णय घेण्यात आला. गेल्या काही वर्षात आपली सामाजिक जबाबदारी पार पाडताना वार्षिक लेखापरीक्षणात ‘अ’वर्ग कायम ठेवला आहे ही कौतुकास्पद बाब आहे.
सभासदांची मोफत डोळे तपासणी
एकता पतसंस्थेच्या सर्व सभासदांची डॉ.योगेश टेणी यांच्या रुग्णालयात मोफत नेत्र तपासणी केली जाणार आहे. तपासणी दरम्यान कोणत्याही सभासदाला चष्मा आवश्यक वाटल्यास तो पतसंस्थेमार्फत मोफत दिला जाणार आहे. नेत्र तपासणीच्या माहिती पत्रकाचे नुकतेच अनावरण करण्यात आले. प्रसंगी पतसंस्थेचे अध्यक्ष ललीत बरडीया, सचिव घनश्याम अडवाणी, डॉ.योगेश टेणी, अजय कुलकर्णी, नामदेव वंजारी, दयानंद कटारिया, प्रवीण कोतकर, पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रणिता कोलते आदी उपस्थित होते. इच्छुक सभासदांनी पतसंस्थेच्या दुसऱ्या मजल्यावरून तपासणी पत्र प्राप्त करावे, असे आवाहन पतसंस्थेतर्फे करण्यात आले आहे.