<
जळगाव, दि.१८ – मास्टर कॉलनी, रजा कॉलनी परिसरात गटारी आणि रस्त्यांची दररोज साफसफाई होत नाही. गटारीतून काढलेली घाण आठवडाभर पडून असते अशी तक्रार नागरिकांनी केली असता उपमहापौर सुनील खडके यांनी लागलीच मुकादम, स्वच्छता निरीक्षक व अधिकाऱ्यांना जाब विचारत पुन्हा तक्रार येणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना केल्या.
‘उपमहापौर आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत उपमहापौर सुनील खडके यांनी प्रभाग १८ मधील विविध परिसराला भेट देत नागरिकांशी चर्चा केली. यावेळी त्यांच्यासोबत महिला व बालकल्याण सभापती रंजना सपकाळे, नगरसेवक रियाज बागवान, नगरसेविका सुनाबी राजू देशमुख, ज़िया बागवान, अक्रम देशमुख हाजी यूसुफ खाटीक, मनोज आहुजा, भरत सपकाळे, मनोज काळे, गोकुळ पाटील, चंदन महाजन आदींसह मनपा अधिकारी उपस्थित होते.
संतोषी माता मंदिर स्थलांतरित करण्याची मागणी
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मागील बाजूला लागून असलेल्या रस्त्यावर श्री संतोषी माता मंदिर आहे. मंदिर रस्त्यावर असल्याने बऱ्याच वेळा त्याठिकाणी वाहतूक कोंडी होत असते. मुख्य वर्दळीचा रस्ता असल्याने मंदिर स्थलांतरित करण्यात यावे, अशी मागणी स्थानिक नगरसेवकांनी केली. तसेच संपुर्ण रस्त्यावरील अतिक्रमण हटवून रस्ता मोकळा करण्याची विनंती देखील त्यांनी केली. उपमहापौर सुनील खडके यांनी याबाबत मनपा अधिकाऱ्यांना सूचना देत कुणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाही याची दक्षता घेत काय करता येईल ते तपासण्यास सांगितले.
गटारींची स्वच्छता करून घाण त्वरित उचलावी
संतोषी माता मंदिर रस्त्यावरील मुख्य रस्त्यालगतची गटार स्वच्छ नसल्याने पाणी तुंबून असते. रजा कॉलनी, मास्टर कॉलनीत गटारी आणि रस्ते साफ केले जात नाही. घाण अनेक दिवस रस्त्यावर पडून असते अशी तक्रार नागरिकांनी केली. उपमहापौर सुनील खडके यांनी मनपा अधिकाऱ्यांना सूचना देत परिसरात कायम स्वच्छता ठेवण्याचे सांगितले.
मुलतानी रुग्णालय परिसराचा विकास करावा
रजा कॉलनीतील एकता हॉल परिसराला संरक्षक भिंत उभारावी, मुलतानी रुग्णालय परिसराचा विकास करावा, हायमास्ट किंवा एलईडी बसवावे, मास्टर कॉलनी नाल्याचे बांधकाम करावे, गटारीवर ढापे नसल्याने नागरिकांना त्रास होतो. अक्सा नगर, बौद्ध वाडा परिसरात गटारींचे काम करावे अशी मागणी नागरिकांनी केली. उपमहापौर सुनील खडके यांनी योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या.