<
एरंडोल( प्रतिनिधी)- येथील सामाजिक कार्यकर्ते तथा ज्येष्ठ पत्रकार नुरुद्दीन मुल्लाजी यांना औरंगाबाद येथील शब्दगंध समूह प्रकाशन तथा ग्रंथमित्र युवा मंडळाच्या वतीने आयोजित शब्दगंध समूह प्रकाशन व विविध क्षेत्रातील उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमात नुरुद्दिन मुल्लाजी यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नुरुद्दिन मुल्लाजी असून उद्घाटन व पुस्तक प्रकाशन करण्याचाही त्यांना बहुमान मिळाला. सूत्रसंचालन संदीप भदाणे व प्रास्ताविक कार्यक्रमाचे आयोजक संदीप त्रिभुवन यांनी केले. याप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण राष्ट्रीय पुरस्कार, महात्मा फुले आदर्श शिक्षक राष्ट्रीय पुरस्कार, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय पुरस्काराने विविध क्षेत्रातील महाराष्ट्रातील गुणवंतांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. नुरुद्दीन मुल्लाजी मार्गदर्शनपर भाषणात म्हणाले की, मला आज पर्यंत २४ पुरस्कार मिळाले आहे त्यात एपीजे अब्दुल कलाम, महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, वल्लभ भाई पटेल अहिल्यादेवी होळकर, महाराष्ट्र गौरव पुरस्कार व उत्कृष्ट समाजसेवक बेस्ट सोशल वर्कर, उत्कृष्ट पत्रकार असे पुरस्कार मिळाले आहे परंतु बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने पुरस्कार मिळावा अशी माझी इच्छा होती, ती आज २५ वा पुरस्कार मिळाल्याने माझी सर्वार्थाने इच्छापूर्ती झाली असल्याचे सांगितले. माझा सन्मान हा सन्मान नाममात्र असून संपूर्ण जळगाव जिल्ह्याचाच तो सन्मान असल्याचे त्यांनी विनम्रपणे सांगितले. कार्यक्रमाला महाराष्ट्रातील अनेक मान्यवर शिक्षक वृंद उपस्थित होते. आभार प्रदर्शन संगीता दाभाडे यांनी केले.