<
राष्ट्रीय महामार्गावरील सर्व हॉटेल्स/रेस्टॉरंट/ढाबे, दुकाने, बाजार तसेच सिनेमागृह/ नाट्यगृहे/ सभागृह/ मंगल कार्यालये/लॉन्स रात्री 10.30 वाजेपर्यतच सुरु राहणार
जळगाव, (जिमाका) दि. 23 – राज्य शासनाकडील 21 डिसेंबरच्या आदेशान्वये महानगरपालिका क्षेत्रात 22 डिसेंबर, 2020 ते 5 जानेवारी, 2021 या कालावधीत रात्री 11.00 ते सकाळी 6.00 वाजेपर्यंत पूर्णत: संचारबंदी (Night curfew) घोषित करण्यात आलेला आहे.
त्यानुसार जळगाव शहर महानगरपालिका क्षेत्रात 22 डिसेंबर, 2020 ते 5 जानेवारी, 2021 पावेतो रात्री 11.00 ते सकाळी 6.00 वाजेपर्यंत पूर्णत: संचारबंदी (Night curfew) घोषित करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी निर्गमित केले आहे.
जळगाव जिल्ह्यातील जळगाव शहर महानगरपालिका, सर्व नगरपालिका व सर्व नगरपरिषद क्षेत्रात दिनांक 31 डिसेंबर, 2020 रोजी रात्री 11.00 वाजेपासून सकाळी 6.00 वाजेपर्यंत पूर्णत: संचारबंदी (Night curfew) घोषित करण्यात आली आहे.
या क्षेत्रातील व राष्ट्रीय महामार्गावरील सर्व हॉटेल्स/रेस्टॉरंट/ढाबे, दुकाने, बाजार रात्री 10.30 वाजेपर्यत सुरु राहतील, जेणेकरुन निर्बधीत कालावधीत नागरिकांची वर्दळ/गर्दी राहणार नाही.
तसेच या क्षेत्रातील सिनेमागृह/नाट्यगृहे/सभागृह/मंगल कार्यालये/लॉन्स व तत्सम ठिकाणी रात्री 10.30 पर्यंत सुरु राहतील. या कालावधीत आयोजित करण्यात येणारे लग्न समारंभ, कार्यक्रम, स्पर्धा व इतर अनुषंगिक कार्यक्रम रात्री 10 वाजेपूर्वी समाप्त करण्यात यावेत.
कोरोना विषाणूच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याबाबत महाराष्ट्र शासनाकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेले आदेश, निर्देश, नियमावली (SOPs) नुसार या कार्यालयाकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेले आदेश लागू राहतील. तसेच महाराष्ट्र शासनाकडून लॉकडाऊन कालावधीत लागू केलेले निर्बंध शिथील करण्याबाबत वेळोवेळी दिलेले निर्देश पुढील आदेश होईपावेतो लागू राहतील.
या आदेशाचे उल्लंघन केल्यास ही बाब भारतीय दंड संहिता, 1860 (45) चे कलम 188, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 51 ते 60 तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील. असे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव श्री. अभिजीत राऊत यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.