<
जळगाव : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे कोरोना प्रतिबंधक लसीकरण करून घेण्यासाठी डॉक्टर्ससह कक्षसेवक, परिचारिका, परिचारक यांनी चांगलाच उत्साह दाखविला आहे. दिवसभरात संध्याकाळी ५ वाजेपर्यंत पूर्ण १०० जणांनी लसीकरण करून घेतले. यामुळे आरोग्य यंत्रणेमध्ये ‘कोविशील्ड’ लसीबाबत प्रचंड उत्साह वाढला आहे.
कोरोनाला नियंत्रित करण्यासाठी पुणे येथील सिरम इन्स्टिट्यूटची ‘कोविशील्ड’ हि लस तयार झाली आहे. जिल्ह्यात एकूण २४ हजार ३२० लसी उपलब्ध झाल्या आहेत.शनिवारी १६ जानेवारीला पहिल्याच दिवशी अधिष्ठाता, शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी लस टोचून घेतल्यानंतर लसीकरण प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. त्यानुसार आता लसीकरणाच्या तिसऱ्या दिवशी बुधवारी २० रोजी सकाळपासून लस घेण्यासाठी आरोग्य यंत्रणेतील विविध घटकांनी गर्दी केली होती. दिवसभरात डॉक्टर्ससह आरोग्य यंत्रणेतील १०० जणांनी लस घेण्याच्या प्रक्रियेत सहभाग घेऊन प्रक्रिया पूर्ण केली. अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैभव सोनार यांनी सकाळी पाहणी करून माहिती जाणून घेतली.
बुधवारी दिवसभरात पहिली लस भूलतज्ज्ञ डॉ. संदीप पटेल यांनी घेतली. तसेच दिव्यांग डॉ. आस्था गणेरीवाल यांनीही लस घेतली. शेवटी ५ वाजता अधिपरिचारिका सलमा सलीम तडवी यांनी १०० व्या क्रमांकावर लस घेतल्यानंतर दिवसभराची प्रक्रिया थांबली.
कोरोना लसीविषयी जनसामान्यांमध्ये काहीशी भीती आहे. मात्र आरोग्य यंत्रणेचे प्रमुख अधिष्ठाता, जिल्हा शल्यचिकित्सक, आरोग्य अधिकारी यांनी जिल्ह्यातील पहिली लस घेऊन हि भीती दूर करीत आदर्श निर्माण केला आहे. पहिल्या दिवशी शनिवारी १६ रोजी ५९, दुसऱ्या वेळी मंगळवारी १९ रोजी ६३ तर बुधवारी पूर्ण १०० जणांनी लस घेतल्यामुळे आरोग्य यंत्रणेच्या घटकांमध्ये आत्मविश्वास वाढला आहे. लस घेतल्यानंतर सर्व लाभार्थ्यांना अर्धा तास निरीक्षण कक्षात डॉ. डॅनियल साझी, डॉ. हृषीकेश येऊळ, डॉ. प्रदीपकुमार शेट्टी यांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले. याठिकाणी अधिपरिचारिका अर्चना धिमते, अधिपरिचरिका जयश्री वानखेडे, कुमुद जवंजार, गायत्री पवार, डाटा एंट्री ऑपरेटर प्रदीप बावस्कर, इशांत पाटील, बापू पाटील, संपत मल्हार, स्वच्छता निरीक्षक अनिल बागलाणे यांनी लसीकरण प्रक्रिया राबविण्याचे यशस्वी नियोजन केले.
“कोरोनाची लस हि पूर्णपणे सुरक्षित आहे. आरोग्य यंत्रणेतील सर्व घटक आता लस घेण्यासाठी पुढे येत आहे. बुधवारी संख्येने ‘शंभरी’ गाठल्याने आनंद आहे. यंत्रणेमध्ये चांगला उत्साह दिसून आला आहे. उर्वरित डॉक्टर्स, परिचारिका, कक्षसेवक हेदेखील पुढील दिवसात लस घेऊन पहिला टप्पा पूर्ण करणार आहेत. “
- अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव