<
जळगाव, दि.१७ – गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण वाढत असून प्रशासनाने सतर्कता बाळगण्याच्या सूचना केल्या असून काही निर्देश ठरवून दिले आहेत. जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण नियंत्रणात राहावे, लॉकडाऊन टाळला जावा यासाठी शासनाच्या निर्देशांचे पालन करावे असे आवाहन जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळातर्फे अध्यक्ष विजय काबरा व सचिव ललीत बरडीया यांनी केले आहे.
जळगाव जिल्ह्यासह शहरात गेल्या काही दिवसापासून कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागले आहे. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सर्व व्यापाऱ्यांची बैठक घेऊन लॉकडाउन टाळण्यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या आहे. जळगावातील सर्व व्यापाऱ्यांनी आपल्या आस्थापनांवर मास्क वापरणे, सॅनिटायझर बाळगणे, शारीरिक अंतर ठेवणे, ग्राहकांना विना मास्क माल न देणे याचे सर्वांनी काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळातर्फे करण्यात आले आहे. शासनाच्या निर्देशांचे योग्य पद्धतीने पालन केल्यास आपल्याला लॉकडाऊनला सामोरे जाण्याची वेळ येणार नाही आणि आपले आरोग्य देखील उत्तम राहील. सर्वांनी नियमांचे पालन करून योग्य दक्षता घेत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला वेळीच रोखावे असे आवाहन देखील महामंडळाने केले आहे.
Ok