<
सामाजिक दायित्वासाठी सीएसआर शायनिंग स्टार अवॉर्ड प्रदान
मुंबई, दि. 20 : कोरोनासारखी संकटे पुढेही येत राहतील, मात्र अशा कठीण काळात एकमेकांना सहकार्य केल्यास समाज आणि देश टिकून राहील, असा आशावाद राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केला. राजभवन येथे झालेल्या वोकहार्ड फाउंडेशनच्या नामवंत कॉर्पोरेट संस्थांना सामाजिक दायित्वासाठी सीएसआर शायनिंग स्टार अवॉर्ड प्रदान करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
व्यासपीठावर वोकहार्ड फाउंडेशनचे विश्वस्त, सीईओ हुजैफा खोराकीवाला, भारतीय विकास संस्थानचे अध्यक्ष डॉ. योगेश दुबे उपस्थित होते.
राज्यपाल म्हणाले, गरीब पीडितांची चिंता करणाऱ्या दानशूर लोकांमुळे समाज जिवंत आहे. दुसऱ्यांना प्रकाश देण्याच्या त्यागी भावनेमुळे मानवी कल्याण होते. शंभर हातांनी धनसंचय करावे, परंतु ते धन हजार हातांनी समाजासाठी वितरीत करावे, ही आपली संस्कृती आहे. समाजाने जे आम्हाला दिले आहे त्याची परतफेड म्हणून आपण समाजाला देणे लागतो ही भावना महत्त्वाची आहे. एकमेकांना सहकार्य करण्याच्या वृत्तीमुळे अन्य देशांच्या तुलनेत भारतात कोरोनाचे बळी कमी प्रमाणात गेले, असे त्यांनी सांगितले.
यावेळी राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार वितरित करण्यात आले. वैयक्तिक विशेष योगदानाबद्दल डॉ.जितेंद्र जोशी, श्रीकांत बडवे, सुरज कुमार यांना तर उद्योग क्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल कोटक महिंद्रा बँक लि. सन्मानित करण्यात आले. अॅनिमल वेल्फेअरसाठी ओएनजीसी यांना सन्मानित करण्यात आले. बालकल्याण क्षेत्रातील कामगिरीसाठी वेदांता लिमिटेड, कोविड कार्यासाठी हिंदुस्थान युनिलिव्हर लि., दिव्यांग घटकांसाठी हिरो मोटोकॉर्प लि., शैक्षणिक क्षेत्रातील कामगिरीसाठी कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, पर्यावरणासाठी अशोक लेलँड लि., आरोग्य क्षेत्रासाठी गेल (इंडिया) लि., कौशल्य विकासासाठी लार्सन अँड टुर्बो लि., ट्रान्सजेंडर एम्पपॉवरमेंटसाठी एस्सार, पाणीपुरवठा व स्वच्छता क्षेत्रातील कामगिरीसाठी आयटीसी लि., महिला सबलीकरणासाठी आरईसी लि. यांना सन्मानित करण्यात आले.
जीवनगौरव पुरस्कार श्री.रतन टाटा यांना देण्यात आला. त्यांच्या वतीने शंतनू नायडू यांनी पुरस्कार स्वीकारला.
डॉ. हुजैफा खोराकिवाला यांनी स्वागत भाषण केले तर डॉ.योगेश दुबे यांनी आभार मानले.