<
जळगाव (दि.26) प्रतिनिधी – एरंडोल तालुक्यातील पद्मालय देवस्थान अंगारकी चतुर्थीनिमित्त तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय श्री गणपती मंदीर देवस्थान विश्वस्त मंडळाने घेतला. दि. 1, 2, 3 मार्च या तीन दिवसांमध्ये अंगारका योग (मंगळकी चतुर्थी) येत आहे. पद्मालय येथे एकाच व्यासपीठावर डाव्या आणि उजव्या सोंडेचे स्वयंभू दोन गणेशजी विराजमान आहेत. अमोद आणि प्रमोद असे त्यांना संबोधले जाते. श्री गणेशजींच्या अंगारकी चतुर्थीला खान्देशातून भाविक भक्त पद्मालय देवस्थानला दर्शनासाठी येत असतात. वर्षभर केलेले संकल्प, व्रत, नैवेद्य, नवस पुर्ण करण्यासाठी येथे गर्दी केली जाते. यामध्ये ग्रामीण भागासह शहरांतूनही भाविक भक्त येतात. मंगळकी चतुर्थीमुळे कटलरी, खाद्यपदार्थाची हॉटेल्स, रसवंती, खेळणींची दुकानेही थाटली जातात. कोरोना संसर्ग वाढत असल्याने खबरदारी म्हणून अंगारकी चतुर्थीसह तीन दिवस देवस्थान दर्शनासाठीसुद्धा बंद ठेवण्यात आले आहे. दरम्यान या तिघंही दिवशी मंदीर परिसरात खाद्यपदार्थासाठी हॉटेल, कटलरी, दुकान, रसवंती, फेरीवाले कुणालाही व्यवसायालासुद्धा बंदी ठेवण्यात आले आहे. भाविक भक्तांना नवस, नैवद्य, धार्मिक पुजा विधी करता येणार नसून तीन दिवस मंदीर बंद राहणार आहे. शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार यात्रा व मंदीर बंदचा निर्णय घेण्यात आला असून भाविक भक्तांनी सहकार्य करावे असे आवाहनही मंदीर व्यवस्थापनातर्फे करण्यात आले आहे.