<
नागपूरदि.२६ : जम्मू कश्मीरमध्ये कर्तव्य बजावत असताना वीर मरण आलेले शहीद सहायक उपनिरीक्षक नरेश उमराव बडोले यांच्या कुटुंबीयांना आज ऊर्जा मंत्री तथा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या उपस्थितीत एक कोटी रुपयांची मदत करण्यात आली.
विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये कोरोना संसर्ग संदर्भात आढावा बैठक झाल्यानंतर पालकमंत्री श्री. नितीन राऊत यांनी शहीद बडोले यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला. शहीद बडोले यांनी अतिरेक्यांशी लढताना दाखविलेले साहस, कर्तव्यपरायणता आणि बलिदानाकरिता त्यांची आठवण कायम केली जाणार आहे. समाजाला त्यांच्या या राष्ट्रप्रेमाचे ऋण कधीही पूर्ण करता येणार नाही, त्यांच्या कुटुंबीयांसोबत शासन कायम असेल, अशी ग्वाही यावेळी पालकमंत्र्यांनी दिली.
जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी यावेळी दिनांक 24 सप्टेंबर 2020 रोजी शहीद नरेश उमराव बडवणे यांनी दाखविलेल्या शौर्याची आठवण करून दिली. 24 सप्टेंबर रोजी नरेश उमराव बडोले हे आपल्या कंपनीसह श्रीनगर आंतरराष्ट्रीय विमान तळाकडे जाणाऱ्या भुयारी मार्गाच्या सुरक्षेत तैनात होते. अचानक सुरू झालेल्या गोळीबारात त्यांना वीरमरण आले. तत्पुर्वी त्यांनी हा हल्ला परतवताना आपल्या सहासाचे दर्शन घडविले. यामध्ये त्यांना वीरमरण आले. त्यांच्या पश्चात त्यांची वीरपत्नी श्रीमती प्रमिला नरेश बडोले व दोन मुली आहेत. आज पालक मंत्री श्री राऊत यांनी त्यांना शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला सोबतच शासनामार्फत एक कोटी रुपयांचा धनादेशही बहाल केला.
यावेळी विभागीय आयुक्त डॉ संजीव कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्ण बी, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर श्रीमती शिल्पा खरपकर आदी उपस्थित होते.