<
जळगाव, दि. 27, (प्रतिनिधी) – गांधी रिसर्च फाउंडेशन व मराठी विज्ञान परिषद, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय नवप्रवर्तन स्पर्धेचा पारितोषिक वितरण कार्यक्रम आज दि. 28 रोजी सायंकाळी 4 वाजता ऑनलाईन पद्धतीने होत आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ व गांधी रिसर्च फौऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर असतील, तर डॉ. विपिन कुमार, गुजरात विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सुदर्शन अयंगार, अणुवैज्ञानिक प्रोफेसर जे. बी. जोशी, मराठी विज्ञान परिषदेचे मानद सचिव ए. पी. देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
सद्यस्थितीत विज्ञानातील अनेक संशोधने व त्याचा वापर नैतिकतेच्या मापदंडावर अपयशी ठरत आहेत. म्हणूनच या कालखंडात नैतिक मूल्यांना प्राधान्य देणारे वैज्ञानिक संशोधन होणे आवश्यक ठरले आहे. गांधी विचारांच्या पार्श्वभूमिवर ‘ग्रामस्वराज्य’ या कल्पनेला नैतिक बळ देण्यासाठी विकेंद्रित, पर्यावरणपूरक, उपयोगी व शाश्वत तंत्रज्ञान निर्माण करण्याच्या प्रक्रियेत विद्यार्थी-विद्यार्थिंनीचा देखील सहभाग करून घेणे मोलाचे ठरते. त्यासाठीच या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पर्यावरण, उर्जा, स्वच्छता, रोजगार व ग्रामोद्योग, कृषी, शिक्षण, सूचना व दळणवळण हे विषय स्पर्धेसाठी देण्यात आले होते. विशेष उल्लेखनीय बाब अशी की, कोरोनासारख्या आव्हानात्मक काळातदेखील या स्पर्धेत ५ वी ते १० वी इयत्तेच्या 1950 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यांनी विविध विषयांना अनुसरून कल्पकतेने आपले नाविन्यपूर्ण प्रयोग सादर केले.
विज्ञान क्षेत्रातील मान्यवर संशोधकांनी या प्रयोगांचे परीक्षण केले. त्यात पुरस्कार प्राप्त स्पर्धकांची निवड करण्यात आली. विजेत्या स्पर्धकांना ऑनलाईन पारितोषिक वितरण सायंकाळी 4 वाजता करण्यात येणार आहे. ऑनलाईन होणाऱ्या या पारितोषिक वितरण कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी https://www.facebook.com/gandhiteerth/live/ तसेच https://www.youtube.com/c/GandhiTeerth/videos या लिंक द्वारे सहभागी होऊ शकता असे आवाहन गांधी रिसर्च फाउंडेशन, जळगाव व मराठी विज्ञान परिषद, मुंबई यांनी केले आहे.