<
मुंबई दि. २७ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी),पुणे मार्फत पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी नि:शुल्क ऑनलाईन मार्गदर्शन दि.२५ फेब्रुवारी २०२१ पासून सुरु करण्यात आले आहे. इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्याची प्रक्रिया बार्टी पुणे च्या https://www.barti.in या संकेतस्थळावर नोटीस बोर्ड तसेच ई-बार्टी अॅप मधील M-governance अंतर्गत पोलीस भरती लेखी परीक्षा मार्गदर्शन या लिंकवर सुरु आहे.
पोलीस भरती पूर्व लेखी परीक्षेकरिता दोन महिन्यांचे प्रशिक्षण देण्यात येणार असून आवश्यकतेप्रमाणे हा कालावधी वाढवण्यात येईल. दर शनिवारी,रविवारी तसेच शासकीय सुट्टयांच्या दिवशी मार्गदर्शन वर्ग बंद राहतील. पोलीस भरती पूर्व लेखी परीक्षेकरिता असलेले सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण, गणित, बुद्धिमत्ता चाचणी असे एकूण ४ अभ्यास घटकांचे दिवसाला २ तास याप्रमाणे ऑनलाईन प्रशिक्षण असेल. प्रत्येक विषयाला स्वतंत्र मार्गदर्शक असतील.
हे प्रशिक्षण वर्ग बार्टीच्या ‘Barti Online’ या युट्यूब चॅनल वरूनही थेट प्रसारीत करण्यात येतील. प्रशिक्षण परस्परसंवादी स्वरूपाचे असेल. प्रशिक्षणामध्ये विषयाचा आवाका, मागील वर्षी विचारण्यात आलेले प्रश्न, जास्त प्रश्न विचारले जाणारे घटक अशा घटकांचा सखोल अभ्यास करण्याची पद्धत, वाचन साहित्य,मार्गदर्शकांच्या टिपणे (नोट्स) याबाबत सखोल मार्गदर्शन केले जाईल. उमेदवारांच्या शंकांचे निरसन ई-मेलद्वारे करण्यात येईल.
बार्टी संस्थेद्वारे आयोजित ऑनलाईन प्रशिक्षणाचा लाभ घेतलेल्या उमेदवारांचा त्यांच्या जिल्ह्यात प्रकल्प अधिकारी, समतादूत यांच्या माध्यमातून शारीरिक प्रशिक्षण (मैदानी प्रशिक्षण) वर्ग घेण्यात येईल, असेही बार्टीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.