जळगाव(प्रतिनीधी)- येथील भारतरत्न डॉ.ऐ.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशी समुह यांच्या विद्यमाने २८ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त ऑनलाईन गुगल मिटवर वेबिनार संपन्न झाला. प्रथम सत्रात महाराष्ट्र अंनिस जिल्हा कार्याध्यक्ष दिगंबर कट्यारे यांनी राष्ट्रीय विज्ञान दिनाचे महत्त्व विषद करीत “चमत्कारातून वैज्ञानिक दृष्टिकोन “या विषयावर सप्रयोग व्याख्यान दिले. चमत्कार दाखवा आणि एकवीस लाख रुपये मिळवा असे जाहिर आवाहनही कट्यारेंनी समिती तर्फे केले. हातातून रक्त तसेच गुलाल काढणे, पाण्याचा दिवा पेटवणे, गडूतून अखंडपणे पाणी मंत्राने काढणे, हवेतून वस्तू काढणे, अंगात आले असतांना जळका कापूर खाणे, जीभेतून सुई आरपार काढणे इत्यादी चमत्कार करुन त्या मागील विज्ञान सकारण स्पष्ट केले. द्वितीय सत्रात महेश शिंपी अ.भा.अंनिस जिल्हा प्रसिद्धी प्रमुख यांनी बुवाबाजी व जादुटोणा विरोधी कायदा या विषयावर सोदाहरण समाजाचं शोषण थांबविण्यासाठी बुवाबाजी थांबवायलाच हवी. त्यासाठी जादुटोणा विरोधी कायदा समजून घेणे महत्त्वाचे आहे. प्रत्येक कलमांचे कायदेशीर विवेचन शिंपी यांनी सुगम भाषेत केले. बेविनारचे आयोजक तथा भारतरत्न डॉ.ऐ.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशी समुह जिल्हा प्रमुख विजय लुल्हे यांनी प्रस्तावना व आभार प्रदर्शन भिशी सदस्य तंत्रस्नेही कलाशिक्षक सुनील दाभाडे यांनी केले. कार्यक्रमासाठी केंद्रप्रमुख अशोक तायडे (जामनेर), सुनील वाघमोडे(चाळीसगाव), फिरोज शेख(भडगाव), डॉ.अय्युब पिंजारी(चोपडा), राजेंद्र चौधरी, पंकज नाले, जितेंद्र धनगर (जळगाव) यांच्यासह असंख्य विज्ञानप्रेमींनी वेबिनारचा लाभ घेतला.