<
जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) दि. 4 – राज्याचे वस्त्रोद्योग धोरण 2018-23 अंतर्गत वस्त्रोद्योग घटकांना वीजदर सवलत लागू करण्यात आली आहे. वीजदर सवलतीस पात्र असणाऱ्या यंत्रमाग घटकांना आयुक्तालयाच्या https:www.dortexmah.gov.in वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करण्याची अंतिम मुदत 28 फेब्रुवारी, 2021 पर्यंत देण्यात आली होती. याबाबत या उद्योगाच्या संघटना तसेच लोकप्रतिनिधी यांनी दिलेल्या निवेदनांच्या अनुषंगाने या कालावधीत वाढ करण्यात आली असुन, नोंदणी करण्याची अंतिम मुदत 31 मे, 2021 पर्यत देण्यात येत आहे.
या मुदतीत जर संबंधित यंत्रमाग धारकांनी अर्ज केला नाही तर त्यांची वीज सवलत जो पर्यंत ते यंत्रमाग घटक नोंदणी करीत नाहीत, तो पर्यंत बंद करण्यात येईल.
शासन निर्णय दिनांक 25 फेब्रुवारी, 2021 अन्वये 27 अश्वशक्ती पेक्षा कमी जोडभार असलेल्या यंत्रमाग धारकांना नोंदणी अर्ज ऑनलाईन किंवा ऑफलाइन यापैकी कोणत्याही प्रकाराने नोंदणी अर्ज सादर करण्याची मुभा देण्यात आली आहे. 27 अश्वशक्ती पेक्षा कमी जोडभार असलेल्या यंत्रमाग धारक ऑफलाईनव्दारे सादर करावयाचे अर्ज वस्त्रोद्योग आयुक्तालयाच्या वेबसाईटवरुन डाऊनलोड करुन, आयुक्त वस्रोद्योग, महाराष्ट्र राज्य, सिव्हील लाईन्स, नागपूर येथे सादर करु शकतात. असे शीतल तेली – उगले, आयुक्त, वस्त्रोद्योग, महाराष्ट्र राज्य, नागपूर यांनी कळविले आहे.