<
गेल्या आठवड्यापासुन श्रावण सुरु झाला. भारताच्या कॅलेंडरमधील सर्वाधिक सण, व्रतवैकल्ये या महिन्यापासून सुरु होतात. चातुर्मासातील सर्वाधिक पवित्र काळ. वेगवेगळ्या प्रकारचे सण, उत्सव, उपास-तापास कालपासुन सुरु झाले. पाऊस सुरु आहे, सगळीकडे थंडी आणि हिरवळीचं साम्राज्य आहे. लोक ट्रेकिंगला जातायत, सहली निघतायत, आनंद आहे. पण कालपासुन घरातल्या कर्त्या बायकांची, सासुरवाशीण सुनांची मात्र कंबर बसली आहे. दर वार हा काही ना काही सण घेऊन येणार, दर दिवशी घरातल्या समारंभाचा पुरणा- वरणाचा स्वयंपाक करण्यासाठी पहाटेपासून स्वयंपाकघरात जुंपावे लागणार, घरातल्या उत्सवाला न कुरकुरता तयार व्हावे लागणार आणि यात ती नतद्रष्ट, दळभद्री पाळी येऊन सगळ्या गोष्टींचा विचका करणार, सासु-सासऱ्याची बोलणी बसवणार, घरच्या पुजेला नाट लागणार… यावर बायकांनी शोधलेला सगळ्यात सोपा उपाय म्हणजे हार्मोन पिल्स खाऊन पाळी पुढे ढकलणे. बहुसंख्य बायका ओव्हर द काउंटर मिळणाऱ्या गोळ्या खाऊन या महिन्यात १५-१५ दिवस क्वचित संपूर्ण महिना पाळी लांबवतात.
बरं, आपण नक्की काय खातोय याची माहिती देखील न घेता अशा गोळ्या घेतल्या जातात. पाळी लांबवण्याच्या गोळ्या या गर्भनिरोधक गोळ्यापेक्षा वेगळ्या असतात. गर्भनिरोधक गोळ्यामध्ये कृत्रिमरित्या बनवलेल्या इस्ट्रोजेन (Estrogen) आणि प्रोजेस्टेरॉन (Progesterone) हे हार्मोन असतात ज्याची प्रक्रिया म्हणून गर्भधारणा होऊ शकत नाही. याउलट पाळी लांबवण्याच्या ज्या गोळ्या असतात त्यात बऱ्यापैकी फक्त प्रोजेस्टेरॉन (Progesterone) नावाच्या संप्रेरकाचा समावेश असतो. ज्याचं काम असतं पाळी लांबवणे. पाळी येण्याच्या अगोदर तीन दिवस या गोळ्या घेणं सुरु केलं जातं. शक्यतो दिवसाला एक किंवा दिवसाला तीन गोळ्या घेतल्या जातात. पुढे जितके दिवस पाळी लांबवायची आहे तितके दिवस त्या गोळ्या घेतल्या जातात. गोळ्या बंद केल्यानंतर ३-४ दिवसात पाळी सुरु होणे अपेक्षित असते. शिवाय या गोळ्या गर्भनिरोधक वगैरे नसतात. ऐकायला तर ह्या सगळ्या गोष्टी फार सोप्या वाटतात पण प्रत्यक्षात त्या तशा नसतात.
एकदा गोळीचं नाव कळालं की, गोळ्या वर्षभर वेगवेगळ्या वेळी घेतल्या जातात. या गोळ्यांची सवय लागुन जाते. डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय सुद्धा अशा गोळ्या सर्रास ओव्हर द काउंटर विकत मिळतात. परिचित बायकांशी या विषयावर बोलल्यानंतर त्यांनी अशा गोळ्या घेतल्यानंतर त्यांना आलेल्या अनुभवात वजन वाढणे, पोट सुटणे, पिंपल्स येणे, चक्कर, डोकेदुखी, अचानक हार्टबीट्स वाढणे,कमी झालेली सेक्स ड्राईव्ह, छातीत येणारा जडपणा आणि अचानकपणे सुरु होणारे स्तनांचे दुखणे, नंतर येणाऱ्या पाळीमधला हेवी फ्लो, प्रचंड अंगदुखी, पाळी आल्यावर आणि संपल्यानंतर देखील होत राहणारे period cramps, अशक्तपणा या गोष्टींचा सामावेश होता. या गोळ्यांचे गंभीर दुष्परिणाम म्हणजे कावीळ आणि ज्यांच्या घराण्यात थ्रंबॉसिस म्हणजे रक्ताच्या गुठळ्या होण्याची जेनेटिक हिस्टरी आहे अशा स्त्रियांमध्ये अचानक आढळुन येणाऱ्या रक्ताच्या गुठळ्यांचे प्रमाण.
बरं या गोळ्या का घेता? असं विचारल्यानंतर सगळ्यांचे उत्तर जवळपास सारखे येत होते. “सासु- सासऱ्याची भीती आणि परंपरा पाळण्याचा धाक.” माझं व्यक्तिगत मत मी यापूर्वी देखील सांगितलय. इस्ट्रोजेन (Estrogen) आणि प्रोजेस्टेरॉन ( Progesterone) हे दोन संप्रेरक बाईचं बाईपण ठरवतात. तिची अस्तित्व आणि तिचं आरोग्य या दोन संप्रेरकांच्या समतोलावर अवलंबुन असतं. जर यात गडबड झाली तर बाईची सगळी आरोग्याची रचना कोलमडुन पडते. तिचं शरीर विविध आजारांचं माहेरघर होतं तेव्हा संप्रेरकांबरोबर फुकटचा खेळ का खेळायचा? असल्या गोळ्यांची सवय लावुन घ्यायची आणि नंतर काही गुंतागुंत उद्भवल्यावर रडत बसायचं हे कुठपर्यंत चालणार ?
घरातली बाई आजारी पडली तर घर ठप्प होतं पण म्हणून बाईचं हाल कुत्रं सुद्धा खात नाही. तिला नक्की काय झालंय याबद्दल कुणीही फार खोलात जाऊन चौकशी करत नाही. “कामाने आजारी पडली असशील जा डॉक्टर कडे” किंवा “चल तुला डॉक्टरकडे सोडतो”
या व्यतिरिक्त बाईला घरच्यांकडुन दुसरी कसली मदत मिळत नाही. ऱाहता राहिला प्रश्न परंपरा पाळण्याचा तर सासु-सासऱ्याला, नवऱ्याला स्वत:च्या पिरिअडची कल्पना देऊन त्यांना मला अशा परिस्थितीत काम करायचं नाही किंवा तुम्हांला मी अशा स्थितीत घरातल्या सणसमारंभात भाग घेणं पटत असेल तर मी काम करते अन्यथा मला आराम करायचाय असं सांगताही येत नसेल तिथे स्त्री- स्वातंत्र्याच्या गप्पा फेल जातात.
मला श्रावण नाही पाळायचा आणि कामाचे ढीग तर अजिबात उपसत नाही बसायचे विशेषकरुन जेव्हा मला त्रास होतोय. ज्या ठिकाणी एकटीच बाई सगळं करत असेल तिथे बिचारीला रोजची कामे चुकत नाहीत. तिथे तिला पाळी आली आहे ही वस्तुस्थिती लपवण्याची वेळ येत असेल तर ती चुक तिची आहे का तिच्या सासरच्या मंडळींची? ज्यांना सगळे सण थाटामाटात सुनांच्या जीवावर साजरे करायचे असतात. का अशावेळी घरातील पुरुष मंडळी, तिचा स्वत:चा हक्काचा नवरासुद्धा बाईच्या पाठीशी उभी राहात नाहीत? का तिच्या शरीरात घडुन येणाऱ्या आणि तिच्या हातात नसणाऱ्या नैसर्गिक प्रक्रियेचा सहानुभूतीने विचार केला जात नाही? का तिच्यावर सण- समारंभात पाळी लांबवण्याच्या गोळ्या घेऊन परंपरा पाळण्याची सक्ती केली जाते? सामाजिक माध्यमांवर फक्त घरात बनवलेल्या साग्रसंगीत जेवणाचे फोटो शेअर करणारा पुरुष वर्ग घरातील बायकांच्या अशा स्थितीचा कधी विचार करु शकेल काय?
आणि नसेल दुसऱ्या कुणाला विचार करता येत तर बाईने स्वत: स्वत:च्या शरीराचा विचार करावा. त्यामुळे श्रावण खरा पाळायचा असेल तर त्यासाठी पाळीबरोबर खेळ करण्याची गरज नाही. असल्या गोळ्या घेऊन पिरिअड्स लांबवण्याचे खेळ तात्पुरता आनंद देतील आणि नंतर आयुष्यातला फार मोठा आनंद हिरावुन घेतील. जिथं आयुष्याचा अर्धा भाग पाळीला बरोबर घेवुन घालवायचाय तिथे श्रावणाचा अपवाद कशासाठी?
– अंजली झरकर
‘स्रोत – तथापि ट्रस्ट निर्मित Let’s Talk Sexuality – सेक्स आणि बरंच काही’