<
जळगाव, (जिमाका) दिनांक 16 :- महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत मृदा व जलसंधारण, वृक्ष संगोपन, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, वैयक्तिक लाभाची कामे तसेच मूलभूत सुविधांचा विकास आदी कामांना अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी नोंदणीकृत सामाजिक संस्थांना मग्रारोहयोची सहायोगी संस्था म्हणून सहभागी करून घेण्यात येणार आहे.वरील कामांशी संबंधित अशासकीय संस्थांना सामावून घेतल्यास निर्माण होणाऱ्या मत्तांची गुणवत्ता वाढण्यास तसेच योजना अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे. यासाठी स्वयंसेवी संस्थेस शासकीय क्षेत्रात काम करण्याचा अनुभव असावा. जलसंधारण किंवा सामुदायिक विकासाचे नियोजन क्षेत्रात काम करण्याचा अनुभव असणाऱ्यांना प्राधान्य देण्यात येईल. स्वयंसेवी संस्थाचे प्रशासकीय संघटन जिल्ह्याच्या ग्रामीण भागात असावे. सदर स्वयंसेवी संस्था निती आयोगाच्या एनजीओ पीएस पोर्टलवर नोंदणीकृत असावी, नसल्यास नोंदणी करुन घ्यावी. निवड होणाऱ्या सामाजिक संस्थेला मग्रारोहयोच्या अंमलबजावणीत जिल्हास्तरावर किंवा तालुकास्तरावर प्रशिक्षण, संवाद, श्रमदान, नियोजनात सहभाग, सामाजिक अंकेक्षण, गुणवत्ता मोजमापच्या कामात सहभाग घेता येईल. या स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून मग्रारोहयो अंतर्गत विविध प्रकारची कामे हाती घेण्यात येतील. निकष पूर्ण करीत असलेल्या जिल्ह्यातील नोंदणीकृत सामाजिक संस्थांनी शेतकरी, गाव, तालुका, जिल्ह्याला समृद्धीकडे नेणाऱ्या या उपक्रमात सहभागी होण्यासाठी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.