<
परिविक्षाधीन आयएएस तुकडीला माध्यमांची हाताळणी या विषयावर केले मार्गदर्शन
नाशिक, दि. 27 मार्च 2021 (विमाका वृत्तसेवा):विकास प्रशासनात प्रसारमाध्यमांचे महत्व अनन्यसाधारण आहे, त्यांच्यासोबत आदराने वागा; त्यांच्या मदतीनेच विकासात्मक योजना जनतेपर्यंत पोहचवा, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केले.
दुरदृश्यप्रणालीद्वारे झालेल्या प्रशिक्षण शिबिरात २०१७, २०१८ आणि २०१९ या तुकड्यांच्या परिविक्षाधीन आयएएस अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी मुंबई येथून अपर मुख्य सचिव (सेवा) सुजाता सौनिक, पुणे येथून यशदाचे महासंचालक चोक्कलिंगम, उपमहासंचालक नयना गुंडे, अतिरिक्त संचालक प्रकाश पोटे आणि परिविक्षाधीन आयएएस अधिकारी उपस्थित होते.
पुढे बोलताना विभागीय आयुक्त श्री.गमे म्हणाले, केंद्र शासन आणि राज्य शासनाने काही मार्गदर्शक तत्वे आपल्याला आखून दिले आहे. शासकीय निर्णय असो किंवा सोशल मीडिया हाताळताना घ्यावयाची काळजी याबाबत शासन स्तरावरून मार्गदर्शक तत्वांच्या स्वरूपात चौकट आखून दिलेली आहे. या चौकटी मध्ये राहून अधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यम प्रतिनिधींसोबत संबंध ठेवले पाहिजे.
विकासात्मक प्रशासनात प्रसारमाध्यमांसोबत आपले संबंध वृद्धिंगत कसे होतील याकडे जाणीवपूर्वक लक्ष देणे आवश्यक आहे. यासाठी जाणीव जागृती बैठक ही संकल्पना राबविणे आवश्यक असते. फक्त पत्रकार परिषदांपुरते प्रसारमध्यमांसोबत संबंध न ठेवता लोककल्याणासाठीच्या योजनांबाबत मत घेणे देखील आवश्यक आहे. प्रसमाध्यमांमध्ये गैरसमजातून एखादी सकारात्मक बातमी नकारात्मक होऊ नये यासाठी माध्यमकर्मींच्या संपर्कात राहणे आवश्यक असल्याचेही यावेळी विभागीय आयुक्त श्री. गमे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले.
यावेळी परिविक्षाधीन आयएएस अधिकारी वर्गाने चर्चासत्रात भाग घेत शंका विचारल्या आणि विभागीय आयुक्त श्री. गमे यांनी शंकांचे निरसन केले.