<
जळगाव, (प्रतिनिधी) – कलींगड विक्रेता असलेल्या शेतक-याच्या मुली समोर मनाला लज्जा वाटेल असे कृत्य केल्याप्रकरणी व दादागिरी करत बळजबरी शेतातील कलींगड तोडण्यास विरोध केल्याने चापटा बुक्क्यांनी मारहाण केली म्हणून फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीवरून बाळू चाटे, विठ्ठल पाटील व सुपडु सोनवणे या तिघा जणांविरुद्ध मध्यरात्री नशिराबाद पोलिस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सविस्तर असे की,काल दुपारी सुमारे साडेपाच वाजेच्या सुमारास सुनसगाव रस्त्यावरील शेतानजीक एक शेतकरी आपल्या अल्पवयीन मुलीसह कलींगड विक्री करण्यासाठी उभा होता. त्यावेळी चारचाकीने जात असलेले तिघे जण खाली उतरले. त्यांनी कलींगड विक्रेत्या शेतक-याकडे मोठ्या कलींगडाची मागणी केली. आपल्याकडे मोठ्या आकाराचे कलींगड नसल्याचे सांगितले असतांना देखील त्यांनी बळजबरीने शेतातील मोठ्या आकाराचे 9 कलींगड तोडले. या कलींगडाचे आठशे रुपये मागीतले असता तिघांना राग आला. त्यांनी कलींगडाची रक्कम देण्यास शेतक-यास नकार दिला. त्यामुळे शेतक-याने ते कलींगड त्यांच्याकडून परत घेतले.
संतप्त झालेल्या तिघा जणांनी कलींगड विक्रेत्यास चापटा बुक्क्यांनी मारहाण करत छातीत लाथ मारली. यावेळी शेतक-याची सोळा वर्षाची अल्पवयीन मुलगी हजर होती. तिच्या मनाला या घटनेमुळे वेदना झाल्या. दरम्यान त्यातील एका जणाने मुलीला बघून हातवारे करत अश्लील वर्तन केले. त्यानंतर सर्वजण त्यांच्या ताब्यातील वाहनाने निघून गेले. त्यावेळी शेतातील दोघा जणांनी त्या चारचाकी वाहनाचा पाठलाग केला. एकाने त्यांना अडवून शेताजवळ पकडले.
शेतक-याच्या एका सहकाऱ्याने त्या लोकांना ओळखले. त्यांची नावे बाळू चाटे, विठ्ठल पाटील व सुपडु सोनवणे असल्याचे कलींगड विक्रेत्या शेतक-यास समजले असता याप्रकरणी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास नशीराबाद पोलिस स्टेशनला कलींगड विक्रेत्याच्या फिर्यादीनुसार तिघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हा भा.द.वि. 354(अ), 447, 323, 504, 506 तसेच बाल लैंगीक अत्याचार विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.उ.नि. साळुंखे करत आहेत.
वाद नसून फक्त विचारणा केली – विठ्ठल पाटील
याबाबत वाळू व्यावसायिक विठ्ठल पाटील यांच्याशी संपर्क करुन माहिती घेतली असता ते म्हणाले की त्या ठिकाणी आम्ही कलिंगड घ्यायला थांबलो, विक्रीला असलेले कलिंगड लहान होते म्हणून आम्ही मोठे कलिंगड मागितले विक्रेत्याच्या मजुरानेचं शेतातून मोठ्या आकाराचे कलिंगड तोडून दिले. त्यानंतर विक्रेत्याने भाव जादा सांगितले म्हणून विचारणा केली असता त्यांनीच कलिंगड हिसाकावून घेतले त्यानंतर आम्ही फक्त अशी पद्धत असते का अशी विचारणा केली. त्या ठिकाणी कुठलाही वाद झाला नाही.