<
बाजारात जायचे असल्यास प्रति तास पाच रुपये शुल्क.
एक तासापेक्षा जास्त वेळ बाजारात थांबल्यास ५०० रुपये दंड.
नाशिक-(सिद्धार्थ तेजाळे) –
नाशिकमध्ये करोनाचा उद्रेक झाला असून स्थिती दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत चालली आहे. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन तीनच दिवसांपूर्वी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकमध्ये लॉकडाऊन लावण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिका आणि पोलीस प्रशासनाने कठोर पावले टाकायला सुरुवात केली असून बाजारपेठेत जायचे असेल तर आता अनेक कठोर नियमांचे अडथळे आधी पार करावे लागणार आहेत. त्यासोबत व्यापारी आणि फेरीवाल्यांनाही वचक बसावा म्हणून पावले टाकण्यात आली आहेत.
नाशिक शहर आणि जिल्ह्यात करोना संसर्ग पुन्हा एकदा वेगाने पसरू लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्येत मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. रविवारी नाशिक महापालिका क्षेत्रात तब्बल २ हजार ४०३ नवीन रुग्णांची भर पडली तर उर्वरित नाशिक जिल्ह्यात १ हजार १५९ नवे रुग्ण आढळले. नाशिक जिल्ह्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्याही वाढून २६ हजार ५३८ इतकी झाली आहे. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी शुक्रवारी नाशिक शहरात थेट रस्त्यावर उतरून गर्दीच्या ठिकाणांना भेट दिली होती व नियमांचे पालन करण्यासाठी विनंती केली होती. नियम पाळले गेले नाही तर लॉकडऊन हा एकमेव पर्याय उरेल, असे ते म्हणाले होते. नाशिककरांना ८ दिवसांची मुदत देतानाच २ एप्रिल रोजी बैठक घेऊन लॉकडाऊनबाबात निर्णय घेतला जाणार असेही त्यांनी नमूद केले होते. भुजबळ यांच्या या इशाऱ्यानंतर नाशिक महापालिका प्रशासन आणि पोलिसांनी संयुक्तपणे शिस्तीचा बडगा उगारला असून त्यासाठी कठोर नियमावली तयार करण्यात आली आहे.