<
कोविडच्या प्रतिकारात स्वच्छाग्रहींची भूमिका महत्त्वाची
मुंबई दि. ३०: कोविड-१९ विषाणूच्या प्रतिकारासाठी सर्वात महत्त्वाचा घटक असणाऱ्या स्वच्छतेच्या प्रचार-प्रसारासाठी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागामार्फत नियुक्त करण्यात आलेल्या राज्यातील स्वच्छाग्रहींना तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.
गेल्या वर्षभरापासून कोविड-१९ विषाणूच्या संसर्गाचा प्रकोप सुरू आहे. याच्या प्रतिकारातील एक सर्वात महत्त्वाचा घटक हा अर्थातच स्वच्छतेशी संबंधित आहे. यामुळे पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने २० डिसेंबर २०१८ च्या शासन निर्णयानुसार ग्रामीण भागात नियुक्त करण्यात येणार्या स्वच्छाग्रहींच्या नियुक्तीला मुदतवाढ मिळावी अशी मागणी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने केली होती. याला राज्य शासनाने मान्यता दिल्यामुळे ३० मार्च २०२१ पर्यंत स्वच्छाग्रहींच्या नियुक्त्या करता येणार असल्याचा निर्णय सरकारने एप्रिल २०२० मध्ये घेतला होता. या अनुषंगाने राज्यात स्वच्छाग्रहींच्या नियुक्त्या करण्यात आल्या असून याची मुदत ३० मार्च २०२१ रोजी संपली आहे.
दरम्यान, कोरोनाचा प्रकोप अद्यापही संपलेला नसल्यामुळे राज्यातील २७ जिल्ह्यांमधील स्वच्छाग्रहींच्या नियुक्तीसाठी मुदतवाढ मिळावी अशी भूमिका पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी घेतली आहे. यानुसार आता स्वच्छाग्रहींना तीन महिने म्हणजे ३० जून २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे .