<
जळगाव (जिमाका) दि. 8 – जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोरोनाची लक्षणे असलेल्या 7 लाख 3 हजार 712 संशयित नागरीकांचे स्वॅब घेऊन प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाद्वारे प्रसिध्दीसाठी दिलेल्या अहवालात कोविड-19 नोडल अधिकारी तथा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा प्रभाव वाढत असतानाच त्यास प्रतिबंध म्हणून प्रशासनातर्फे कोरोनाच्या चाचण्या वाढविण्यावर भर दिला जात आहे. जिल्ह्यात कोरोनाचा बाधित रुग्ण आढळल्यानंतर त्याच्या संपर्कातील किमान 12 ते 15 संशयितांचे स्वॅब घेऊन तपासणी करण्यात येत आहे. त्याचबरोबर ज्या व्यक्तींना कोरोना सदृष्य लक्षणे आढळून येतात त्यांचीही कोरोना चाचणी करण्यात येत आहे. शिवाय माझे कुटूंब, माझी जबाबदारी मोहिम जिल्हाभरात प्रभावीपणे राबविण्यात आली त्यावेळीही ज्येष्ठ नागरीक तसेच कोमॉर्बिड रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून आल्यास त्यांचेही स्वॅब घेऊन तपासणी करण्यात आली आहे. शिवाय पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या सुचनेनुसार व जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागामार्फत संपूर्ण् जिल्ह्यात सध्या कोरोना संशयित रुग्ण शोध मोहिम राबविण्यात येत आहे. जेणेकरुन जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होईल. त्याचबरोबर तपासणीत बाधित आढळलेल्या रुग्णांचे त्वरीत निदान होऊन त्यांचेवर त्वरीत उपचार करणे सोईचे व्हावे, याकरीताही जिल्हाभरात मोठ्या प्रमाणात शिबिरे घेऊन संशयितांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे.
जिल्ह्यात मागील महिनाभरापासून दैनंदिन 5 हजारपेक्षा अधिक कोरोना संशयतिांची चाचणी करण्यात येत आहे. तर बुधवार (7 एप्रिल रोजी) 11 हजार 221 कोरोना संशयितांचे अहवाल तपासण्यात आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 2 लाख 36 हजार 507 संशयितांची आरटीपीसीआर चाचणी तर 4 लाख 67 हजार 205 संशयितांची रॅपिड ॲन्टीजेन चाचणी असे एकूण 7 लाख 3 हजार 712 संशयितांच्या अहवालाची तपासणी करण्यात आली आहे. यापैकी 6 लाख 3 हजार 856 अहवाल निगेटिव्ह तर 97 हजार 99 अहवाल पॉझिटिव्ह आले असून 1 हजार 462 अहवाल ईतर आले आहे. तपासणी करण्यात आलेल्या अहवालांपैकी पॉझिटिव्ह आढळलेल्या अहवालांची टक्केवारी 7.24 इतकी आहे. सद्यपरिस्थितीत जिल्ह्यात 1 हजार 305 कोरोना चाचणी अहवाल प्रलंबित असल्याचेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.