<
जळगांव(प्रतिनिधी)- रेमडीसीवीरचा पुरवठा शासनाने ताब्यात घेतल्यापासून रेमडीसीविर मिळवण्याकरता पेशंटच्या नातेवाईकांना जीवाचे रान करून देखील रेमडीसीविर उपलब्ध होत नाही. किंबहुना ही यंत्रणा शासनाने ताब्यात घेणे अगोदर तरी दोनशे पाचशे रुपये जास्त देऊन का होईना रेमडीसीविर इंजेक्शन मिळत होते, परंतु ही यंत्रणा शासनाने ताब्यात घेतल्यापासून रेमडेसिविर मिळणे दुरापास्त होऊन बसले आहे आणि जर मिळालेच तर काही हारामखोर १५ ते २० हजार रुपयांना विकत आहेत, आम्ही या निवेदनाद्वारे सांगू इच्छितो की रेमेडेशिवरचा तुटवडा आणि ऑक्सिजनची कमतरता या दोन्ही गोष्टींमुळे शहरातील डॉक्टर मंडळी आणि मेडिकल धारक हवालदिल तर झालेले आहेतच. पण त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर मंडळी आणि मेडिकल धारक यांचा दोष नसताना त्यांच्या बद्दल सर्व सामान्य जनतेच्या मनात दिवसेंदिवस असंतोष निर्माण होत आहे आणि भविष्यात हकनाक एखादे हॉस्पिटल अथवा डॉक्टर किंवा कदाचित एखादा मेडिकल धारक या असंतोषाचा बळी पडू शकतो . कारण प्रत्येकाच्या जवळचे नातेवाईक , मित्र किंवा मित्रपरिवारातील कुणी ना कुणी प्रत्यक्ष डोळ्यासमोर मृत्यू पावत आहेत आणि म्हणून येत्या चार दिवसात जर प्रत्येक हॉस्पिटलमध्ये जेवढे पेशंट (रुग्ण) आहेत तेवढे रेमडीसीविर आणि जेवढा आवश्यक आहे तेवढा ऑक्सिजन पुरवठा सुरळीत न झाल्यास दिनांक २३ एप्रिल रोजी समता सैनिक दल जळगाव जिल्हा शाखेच्या वतीने तसेच वेळेवर रेमडीसीविर आणि ऑक्सिजन अभावी ज्यांचे आप्तस्वकीय मरण पावले आहेत ते पीडित असे सर्व मिळून जिल्हाधिकारी कार्यालया समोर कायद्याच्या चौकटीत राहून प्रचलित नियम पाळून धरणे आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
प्रसंगी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास अथवा निर्माण होणाऱ्या कोणत्याही परिस्थितीत सर्वस्वी आपण आपले शासन आणि प्रशासनच जबाबदार राहील. असे जिल्हाधिऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. तसेच सदरील निवेदन मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री यांना ई-मेल द्वारे कळविण्यात आले आहे