<
सुलज (ता. जळगांव जामोद, जि. बुलढाणा) कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी “ब्रेक दि चैन” हा उपक्रम प्राधान्याने हातात घेऊन शासन निर्देश जाहीर केले आहेत, त्यामध्ये अत्यावश्यक सेवा (सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत) वगळता इतर सर्व सेवा पूर्ण वेळ बंद ठेवण्याचे आदेश ग्रामस्तरापर्यंत प्राप्त झाले आहेत. या आदेशान्वये ग्राम प्रशासन सुलज यांनी काल रात्री दवंडी देवून जनतेला आठवडी बाजार निमित्त नियम व अटी बाबत अवगत केले होते, त्या आदेशाचे पालन करत गावातील भाजीपाला विक्रेत्यांनी घरासमोर भाजीपाल्याची दुकाने लावली तर काही भाजीपाला विक्रेत्यांनी गावात फेरी मारून भाजीपाला विक्री केली, यामध्ये गावातील जनतेला ताजा व चांगल्या गुणवत्तेचा भाजीपाला गावातच आणि घरासमोरच उपलब्ध झाला, परंतु या आदेशामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात येऊ नये हा प्रमुख उद्देश ठेवून वरिष्ठ स्तरावरून एक स्थानिक पातळीवरील सुरक्षा म्हणून निर्देश दिले आहेत. आदेशाचे पालन होत आहे की नाही हे पाहण्यासाठी तलाठी सकाळीच घटनास्थळी हजर होऊन संबंधित विक्रेते आणि ग्राहकांना जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडून प्राप्त सुचनांचे पालन करा आणि सुरक्षित रहा असे सांगून जवळपास ११ वाजेपर्यंत सर्व हालचालींवर लक्ष ठेवून होते, सोबतच ग्रामसेवक यांनी सुद्धा गावातील कोरोना संसर्ग व रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्याचे सांगून नियम व अटींचे कडक अंमलबजावणी करत दंडनीय कार्यवाही करू असे निर्देश दिले.
भाजीपाला विक्रेत्यांच्या प्रतिक्रिया –
१) कोरोना प्रादुर्भावासाठी लागू केलेल्या निर्बंधामुळे भाजीपाला पिकविणाऱ्या छोट्या शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे परिणामी या ४ तासाच्या वेळेमध्ये भाजीपाला कमी विकल्या जातो, त्यामुळे विक्री न झालेल्या मालाचे तर नुकसान होतच आहे त्यासोबत लावलेला आर्थिक खर्च सुद्धा वसूल होत नाही – काशिनाथ तायडे (शेतकरी)
२) अत्यावश्यक सेवा मध्ये भाजीपाला विकण्यासाठी सकाळी ७ – ११ हा वेळ कमी असून तो दुपारी २ वाजेपर्यंत असावा अशी अपेक्षा भाजीपाला विक्रेत्यांनी केली. – जगनाथ सांबळे (शेतकरी)
३) शासन आदेशाने भाजीपाला विक्रेत्यांना फेरी व घरीच दुकाने लावून विक्री करण्यास सांगितल्यामुळे यामध्ये अनेक प्रकारच्या भाज्या विकणाऱ्या व्यापाऱ्यांचे नुकसान होत आहे, त्यासाठी गावातील प्रमुख ठिकाणीच ठराविक अंतरावर विक्रेत्यांना भाजीपाल्याची दुकाने लावण्यास परवानगी द्यावी. – शिवाजी गायगोळ (व्यापारी).
४) कोरोना महामारीमुळे शेतकऱ्यांच्या मालाला भावतर मिळतच नाही पण आज स्थितीत निर्बंधांमळे आहे तो भाजीपाला सुद्धा विक्री होत नसल्यामुळे आर्थिक अडचण निर्माण झाली आहे त्यामूळे येत्या वर्षी पेरणी कशी करावी असे संकट उभे झालं आहे. – अनिल सोनोने.
५) आठवड्यातून एक दिवस बाजार असतो पण तोही बाजार बंद असल्यामुळे गावातील भाजीपाला पिकविणाऱ्या शेतकऱ्यांनी शासन नियमांचे पालन करून घरीच दुकाने लावली व ग्राहकांनी मास्क लावून, सुरक्षीत अंतर ठेऊन भाजीपाला खरेदी करावा असे आव्हान विक्रेत्यांनी केलें – विठ्ठल धोटे (शेतकरी)
६) कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रत्येकानी स्वतः नियमांचे पालन करत आज भाजीपाला खरेदी केला, पण आठवडी बाजारतून मिळणारे उत्पन्न आणि आता मिळत असलेल्या उत्पन्नात घट झाली आहे, लोक भितीमुळे घराबाहेर पडताना कमी दिसतात, विक्रीत घट झाल्यामुळे भाजीपाला उत्पादन करणारे शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत – सुभाष सरोदे
७) गावापासून जवळच असलेल्या आसलगाव (बाजार) येथे भाजीपाला विक्रीसाठी निर्बंध नाहीत मग गावातच असे निर्बंध का? असा प्रश्न भाजीपाला विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांनी उपस्थित करून व्यथा मांडली; गावामध्ये ८ – १० भाजीपाला पिकविणारे शेतकरी आहेत त्यांना बाहेर गावी जाऊन भाजीपाला विकणे धोक्याचे वाटते म्हणून गावातच भाजीपाला विकून गावातील लोकांना ताज्या व चांगल्या हिरव्या भाज्या उपलब्ध होतील, आमची शासानाला विनंती आहे की, सकाळी ७ – ११ यावेळात मास्क लावून, सुरक्षीत अंतर ठेवून आणि गर्दी होऊ न देता एका परिसरात ५० – १०० फूट अंतरावर गावातीलच शेतकऱ्यांना दुकाने लावू द्यावे, जेणेकरून भाजीपाला पेरणी आणि मशागतीला लागलेला खर्च तरी मिळेल, नफ्याची आम्ही अपेक्षाच सोडून दिली आहे. – विठ्ठल सोनोने (शेतकरी)
८) एकच भाजी असल्यामुळे मी गावात फिरून विक्री केली, पण आठवडी बाजारात मिळणारे भाव आणि गावात फिरून मिळालेले भाव या खुप फरक पडत आहे, परिणामी लावलेला खर्च सुद्धा निघेल की नाही अशी शंका आहे – निवृत्ती रहाणे (शेतकरी)
गावातील जागरूक तरुणांनी संसर्गाचे गांभिर्य ओळखून सकाळी ११ नंतर बाहेर गावातून मास विक्रीसाठी आलेल्या विक्रेत्याला व त्याच्या सोबत असलेल्या व्यक्तीला कोरोनाच्या नियमाचे उल्लंघन करत असून आमच्या गावात तुमच्या फिरण्यामुळे संसर्ग पसरु शकतो, त्यामूळे तुम्ही तत्काळ इथून निघून जा अन्यथा संबंधीतांना कार्यवाही करण्यासाठी बोलवून घेतो असे सांगितले. गावातील जागरूक तरुणांच्या सहकार्यामुळे संसर्गाचा प्रसार थांबविणे शक्य आहे असे यावरुन दृष्टिपथात आले. प्रत्येक गावातील जागरूक तरुणांनी सद्य परिस्थितीचे गांभीर्य ओळखून समज-गैरसमज दूर करावे, जेणेकरून गावासह प्रत्येक नागरिकाचे आरोग्य सुदृढ आणि निरोगी राहील अशी भुमिका शिक्षणक्रांतीचे राज्य समन्वयक यांनी व्यक्त केली.