<
जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) दि. 4 – शांतता, तणावमुक्ती व भयमुक्तीसाठी आनापान साधना प्रशिक्षण महत्वपूर्ण असून जिल्ह्यातील जे आरोग्य कर्मचारी, कोरोना वॅरियर्स, कोविड रुगण व त्यांचे नातेवाईक यांना या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावयाचा असेल त्यांनी आपली नोंदणी करुन या प्रशिक्षणात सहभागी व्हावे. असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी केले आहे.
कोविडच्या दुसऱ्या लाटेने केवळ आरोग्य सेवा प्रणालीलाच नाही तर संपूर्ण देशाला नमविले आहे. कोविड वॉरियर्सना म्हणजेच सर्व आरोग्य कर्मचारी कोरोनाशी लढा देतांना स्वत: आजारी पडत आहेत. त्यांच्यात तणाव, भय, अशांतता वाढत आहे. सध्या कोविड वॉरियर्सना बळकट, खंबीर करण्याची गरज आहे. कोविड हेल्थ कर्मचाऱ्यांच्या ताणतणावाबाबत शासनही प्रयत्नशील आहेत. ताण-तणाव कमी करण्यासाठी विपश्यना करणे महत्वाचे असून आनापान साधना ही विपश्यनेची पहिली पायरी आहे.
कोरोनाग्रस्त रुग्णांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी स्वत:ला शांत, तणावमुक्त, भयमुक्त ठेवणे अतिशय आवश्यक आहे. ज्यामुळे त्यांची प्रतिकारशक्ती सुधारेल, त्याचबरोबर सायटोकिन स्टॉर्मपासून बचाव करण्यास मदत होईल असे प्रयत्न राज्यात केले जात आहेत. ठाणे, नागपूर आणि सोलापूर येथील काही कोविड रुग्ण दररोज आनापानचा सराव केल्यामुळे शांत, तणावमुक्त झाल्याचे दिसून येत आहेत.
शांततेचा, तणावमुक्तीचा साधा, सोपा व लगेचच परिणाम देणारा उपाय सर्व कोविड रुग्णांपर्यंत, कोविड केअर सेंटरपर्यत तसेच आरोग्य विभागातील सर्व कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचविण्याची गरज आहे. तसेच सर्व कोविड सेंटर, क्वांरन्टाईन कोरोना रुग्ण, होम क्वांरन्टाईन कोरोना रुग्ण, कोविड केअर सेंटरमधील कोविड वॉरियर्स तसेच आरोग्य विभागातील सर्व कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवून गरजूना मानसिकदृष्टया बलवान होण्याची संधी प्राप्त करुन देणारा आहे.
यासाठी आनापान ध्यान सत्राचे आयोजन करण्यात आले असून या सत्रात सामील होणाऱ्यांनी नोंदणीकरीता https://forms.gle/SdY५EvrnTFarUHK२६ या लिंकचा वापर करावा. नोंदणीनंतर सत्रात सामील होण्याविषयीची माहिती संबंधितांना त्यांच्या व्हाटसॲप क्रमाकांवर पाठविण्यात येईल. या सत्रात सहभागी होण्यासाठी कोणतीही फी आकारली जाणार नाही. सहभागी व्यक्तींना या प्रशिक्षणात मोबाइल किंवा लॅपटॉपवरुन सहज सहभागी होता येईल. अधिक माहितीसाठी 7620212980/9850832881/7385344729/ 8975959924 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. असे सेक्रेटरी, विपश्यना विशोधन विन्यास, मुंबई यांनी कळविले आहे.
जळगाव जिल्ह्यातील ज्या आरोग्य कर्मचारी, कोरोना वॅरियर्स, कोविड रुगण व त्यांचे नातेवाईक यांना या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावयाचा असेल त्यांनी आपली नोंदणी करुन प्रशिक्षणात सहभागी व्हावे, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.
००००