<
महापौरांनी दिल्या सूचना : नागरिकांनी सुरक्षित अंतर राखावे
जळगाव, दि ४ – शहरातील लसीकरण केंद्रावर नागरिकांची गर्दी होत असून लसीकरण केंद्र कोरोना हॉटस्पॉट ठरण्याची शक्यता आहे. लसीकरणासाठी येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची पल्स ऑक्सिमीटरने तपासणी केल्याशिवाय पुढील प्रक्रिया करून लस देऊ नये, अशा सूचना महापौर जयश्री महाजन यांनी दिल्या आहेत.
शहरातील काही लसीकरण केंद्रांना भेट देत महापौर जयश्री महाजन यांनी मंगळवारी पाहणी केली. अनेक लसीकरण केंद्रांवर नागरिकांची मोठ्याप्रमाणात गर्दी असून त्यामुळे कोरोनाचा धोका अधिक असल्याचे दिसून आले. महापौर जयश्री महाजन यांनी तात्काळ सर्व लसीकरण केंद्राला सूचना केल्या असून प्रत्येक नागरिकाची पल्स ऑक्सिमीटरने तपासणी केल्याशिवाय त्यांना केंद्रात प्रवेश देण्यात येऊ नये, असे त्यांनी सांगितले आहे.
..तर लागलीच होणार अँटीजन टेस्ट
लसीकरण केंद्रावर एखाद्या रुग्णाचे तापमान अधिक आढळले किंवा त्याच्या शरीरातील ऑक्सिजन लेव्हल कमी झालेली आढळून आल्यास त्या व्यक्तीची अँटीजन टेस्ट करण्यात यावी. रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्यास त्याला कोविड केअर सेंटरला पाठवावे, अशा सूचना देखील महापौर जयश्री महाजन यांनी दिल्या आहेत.
नागरिकांनी सोशल डिस्टनसिंगचे पालन करावे
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांमध्ये लस घेण्याबाबत जागरूकता निर्माण झाली आहे ही बाब कौतुकास्पद आहे परंतु आपल्या हलगर्जीपणामुळे कोरोना संसर्ग वाढण्याचा धोका आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण केंद्रावर नागरिकांनी गर्दी करू नये तसेच रांगेत उभे राहताना सुरक्षित अंतर ठेवावे, असे आवाहन देखील महापौर जयश्री महाजन यांनी केले आहे.