<
आतापावेतो 12 लाख 95 हजार 450 लाभार्थ्यांनी घेतला शिवभोजन थाळीचा लाभ
जळगाव, (जिमाका) दि. 5 – कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत 15 एप्रिलपासुन विशेष निर्बंध लागू करण्यात आले आहे. या काळात कोणीही गरीब व गरजू व्यक्ती उपाशी राहू नये. याकरीता राज्य शासनाने राज्यात शिवभोजन थाळी मोफत देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा जळगाव जिल्ह्यातील गरजूंना चांगलाच फायदा झाला असून निर्बंध काळात जिल्ह्यात 94 हजार 857 लाभार्थ्यांनी शिवभोजन थाळीचा मोफत लाभ घेतल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यवंशी यांनी दिली आहे.
राज्यातील गरीब आणि गरजूंसाठी शिवभोजन थाळी योजना राबविण्याचा महत्वाकांक्षी निर्णय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी 1 जानेवारी, 2020 रोजी घेतला. त्यानुसार जळगाव जिल्ह्यात, जळगाव शहरात ही योजना सर्वप्रथम राबविण्यात आली. 26 जानेवारी, 2020 रोजी या योजनेचा शुभारंभ पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. सुरूवातीस जिल्ह्यासाठी 700 थाळ्यांचे उद्दिष्ट शासनाकडून देणेत आले होते. त्यानंतर फेब्रुवारी, 2020 मध्ये हा इष्टांक दुप्पट म्हणजेच 1400 थाळी इतका करण्यात आला. तर शासनाच्या 26 मार्च, 2020 च्या परिपत्रकानुसार तालुका स्तरावर शिवभोजन योजनेचा विस्तार करण्यात येऊन जिल्ह्याचा इष्टांक 3 हजार 500 थाळींपर्यंत वाढविण्यात आला. शासनाने टप्प्याटप्प्याने उद्दिष्टाबरोबरच क्षेत्राचा देखील विस्तार करून ही योजना तालुकास्तरावर कार्यान्वित केली.
जळगांव जिल्ह्यात सद्यस्थितीत एकूण 38 शिवभोजन केंद्र कार्यरत आहेत. त्यापैकी शहरी भागात 16 व ग्रामीण भागात 22 केंद्र आहेत. शहरी भागात 16 केंद्रामधून 1 हजार 250 थाळ्या तसेच ग्रामीण भागात 22 केंद्रामधून 2 हजार 175 थाळ्या वितरीत करण्यात येतात. शिवभोजन ॲपवर प्रत्येक लाभार्थ्याचा फोटो व लाभार्थ्याचे पुर्ण नांव याची नोंद घेण्यात येते. लाभार्थ्यांना वरण, भात, एक भाजी आणि दोन चपाती एका थाळीमध्ये देण्यात येत आहे.
‘ब्रेक द चेन’ अंतर्गत 15 एप्रिल, 2021 पासुन विशेष निर्बंध लागू असल्याने शासनाने एक महिना कालावधीसाठी शिवभोजन केंद्रांचा इष्टांक दिडपटीने वाढवून दिला असून त्यानुसार जिल्ह्यात कार्यरत असलेल्या 38 शिवभोजन केंद्रांना इष्टांक दिडपटीने वाढवून दिल्याने याचा लाभ जिल्ह्यातील हजारो लाभार्थ्यांना दररोज होत आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात दररोज 5 हजार 125 थाळ्यांचे वितरण सुरू आहे.
शिवभोजन केंद्रात मिळणारी थाळी यापुर्वी दहा रूपयांना मिळत होती. जास्तीत जास्त गरीब व गरजूंना लाभार्थ्यांना याचा लाभ मिळावा यासाठी मागील लॅाकडाऊन कालावधीपासुन शासनाने एका थाळीसाठी केवळ पाच रुपये किंमत ठेवली होती. आता विशेष निर्बंध कालावधीमुळे एक महिना ही थाळी पुर्णपणे मोफत देण्यात येत आहे. याचा लाभ जिल्ह्यातील हजारो गरीब आणि गरजू दररोज घेत असून निर्बंध कालावधीत जिल्ह्यात या मोफत शिवभोजन थाळीचा लाभ 94 हजार 857 लाभार्थ्यांनी घेतला आहे. तर राज्यात शिवभोजन थाळी योजना कार्यान्वित झाल्यापासुन आजपावेतो 12 लाख 95 हजार 450 लाभार्थ्यांनी शिवभोजन थाळीचा लाभ घेतला आहे.
कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील शिवभोजन केंद्रांमध्ये लाभार्थ्यांना पार्सल स्वरूपात जेवण देण्यात येत आहे. केंद्राचे आवारात सोशल डिस्टन्सिंगचे कसोशीने पालन करावे, सॅनिटायझरचा वापर करावा. लाभार्थींची संख्या वाढल्यास रांगा करून दोन ग्राहकात आवश्यक अंतर (किमान 6 फूट) ठेवावे. त्यानुसार जमिनीवर मार्किंग करणे, केंद्र चालक आणि केंद्रांमध्ये काम करणारे कर्मचारी यांनी आणि लाभार्थ्यांनी मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले असून तशा सूचना जिल्ह्यातील शिवभोजन केंद्र चालकांना देण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली निर्बध काळात जिल्ह्यातील गरीब आणि गरजू लाभार्थ्यांना आहार पुरविणारी शिवभोजन थाळी योजना तारणहार ठरली असल्याचेही जिल्हा पुरवठा अधिकारी श्री. सुर्यवंशी म्हटले आहे.