<
अ.भा.मराठी नाट्य परिषद व खान्देश लोककलावंत विकास परिषदेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन दिले निवेदन
जळगाव (प्रतिनिधी) – सद्यस्थितीत कोरोनाच्या निर्बंधांमुळे . गेल्या दीड वर्षापासून सर्व कलांचे सादरीकरण बंद झाले आहे. यामुळे या कलाप्रकारांचे सादरीकरण करुन आपली उपजिविका करणाऱ्या कलावंतांवर मात्र आर्थिक कुऱ्हाड कोसळली आहे. या कलावंतांना आजवर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद जळगाव जिल्हा शाखा व खान्देश लोककलावंत परिषदेतर्फे धान्य स्वरुपात मदत करण्यात आली परंतु जिल्हाभरातील गरजू कलावंतांची संख्या पाहता ही मदत अपूरी पडत असल्याने प्रशासनाने याबाबतीत लक्ष घालून जास्तीत जास्त कलावंतांना मदत मिळावी यासाठी हे निवेदन देण्यात आले.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद जळगाव जिल्हा व खान्देश लोककलावंत विकास परिषदेतर्फे देण्यात आलेल्या या निवेदनात म्हटले आहे की, जळगाव जिल्ह्याला लोककला सादरीकरणा तसेच नाटक, नृत्य, संगीताची प्रदीर्घ अशी परंपरा आहे. एकेकाळी जळगावच्या लोककला, नाट्य, संगीत सृष्टीने सुवर्णकाळ पाहिला आहे. जळगावातील तमाशा मंडळानी उभ्या महाराष्ट्राला आपल्या कलासादरीकरणाने वेड लावले होते. त्याचप्रमाणे वहीगायन, वासुदेव, गोंधळी सारखा दुर्मिळ प्रकार आजही जळगाव जिल्ह्यात जोपसला जात आहे. जळगावच्या नाट्यकलावंतांनी राज्यभरातील एकांकिका स्पर्धांसह विविध नाट्यस्पर्धा गाजविल्या आहेत. तसेच संगीत व नृत्य क्षेत्रातील जळगाव जिल्ह्यातील कलावंतांची कामगिरी उल्लेखनीय आहे. एकंदरीतच या प्रयोगशील कलांच्या सादरीकरणावर अनेक कुटुंबाची गुजराण होत असते.
सद्यस्थितीत गेल्या दीड वर्षापासून कोरोनामुळे लॉकडाऊन व अन्य विविध कारणांनी लोककलांचे सादरीकरण बंद झाले आहे. त्यामुळे या प्रयोगशील कलांवर अवलंबून असणारे अनेक कलावंत व त्यांचे कुटुंबिय आर्थिक ओढगस्तीने ग्रासले आहेत. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद जळगाव जिल्हा शाखा, अखिल भारतीय मराठी लोककलावंत परिषद या आमच्या संस्थांच्या माध्यमातून आम्ही या कलावंतांना मदत करण्याचा प्रयत्न गेल्या वर्षभरात केला आहे परंतु शासकीय स्तरावरून अद्यापही या कलावंतांना मदत मिळालेली नाही.
आजच्या या परिस्थितीत आर्थिक गर्तेत सापडलेल्या या कलावंतांना भरीव अशा आर्थिक मदतीची अपेक्षा असून, प्रशासकीय स्तरावर आपल्यापर्यंत याबाबतीत सर्वच प्रयोगशील कलांचे सादरीकरण करणाऱ्या या कलावंतांचा आवाज पोहचावा व आपल्या माध्यमातून सरकारी स्तरावर त्यांना आर्थिक मदतीचा हात मिळावा.
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद जळगाव जिल्ह्याच्या अध्यक्षा ॲड.रोहिणीताई खडसे खेवलकर यांच्यासह खान्देश लोककलावंत विकास परिषदेचे अध्यक्ष विनोद ढगे, नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह ॲड.पद्मनाभ देशपांडे, सहकार्यवाह योगेश शुक्ल, कार्यकारिणी सदस्य संदीप घोरपडे (अमळनेर) आदी उपस्थित होते.
यावेळी पत्रकारांशी बोलतांना ॲड.रोहिणीताई खडसे खेवलकर यांनी आवाहन केले की, जळगाव जिल्ह्यातील दानशूर व्यक्ती तसेच उद्योजकांनीही पुढे येऊन या कलावंतांना मदत करावी. याकरिता ज्यांना कोणासही मदत करावयाची असल्यास त्यांनी खान्देश लोककलावंत विकास परिषदेचे अध्यक्ष विनोद ढगे (मोबाईल क्रमांक ८८३०४९५८२२) यांना संपर्क करावा.
कीर्तनकार, टाळकरी व भजनी मंडळांना आर्थिक मदत मिळावी
कोरोना काळात मंदिरे बंद असल्याने धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमदेखील बंद आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील कीर्तनकार व त्यांना सहकार्य करणाऱ्या टाळकरी व भजनी मंडळांवरदेखील उपासमारीची वेळ आली आहे. शासनाच्या माध्यमातून समाजातील अनेक घटकांना आतापर्यंत मदत जाहीर करण्यात आली आहे, मात्र कीर्तनकार, टाळकरी व भजनी मंडळे यापासून वंचित आहेत. जवळपास ९० टक्के कीर्तनकारांचा उदरनिर्वाह हा कीर्तनावर अवलंबून असल्याने, शासनातर्फे कीर्तनकार, टाळकरी व भजनी मंडळांना आर्थिक मदत मिळावी याकरितादेखील ॲड.रोहिणीताई खडसे खेवलकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
रोहिणीताईंच्या आवाहनाला जिल्हाधिकारी कार्यालयातच प्रतिसाद
पत्रकारांशी बोलतांना रोहिणीताईंनी जिल्ह्यातील दानशूर व्यक्ती व उद्योजकांनी कलावंतांना मदत करण्याचे आवाहन केले. याप्रसंगी सुनसगाव येथील सरपंच निलेश शालिक साबळे आपल्या वैयक्तिक कामासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. त्यांनी रोहिणीताईंच्या आवाहनाला तात्काळ प्रतिसाद देत कलावंतांकरिता ५ क्विंटल गहू देण्याची तयारी दर्शवून विनोद ढगे यांना संपर्क केला.